मोखा गावातील घटना : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोपअमरावती : आर्थिक परिस्थितीला कंटाळून आदिवासी दाम्पत्याने स्वत:ला जाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना धारणीतील मोखा गावात सोमवारी दुपारी घडली. बेटी मोती धांडे (२२) व मोती छोटेलाल धांडे (३५) असे मृतांची नावे आहेत. या घटनेत धारणी येथील डॉक्टरांनी उपचार न करताच जखमी रुग्णांना अमरावती हलविण्याचे सांगितल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आर्थिक विवंचनेत असणाऱ्या धांडे दाम्पत्यांनी सोमवारी दुपारी स्वताच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले. गावकऱ्यांनी तत्काळ कळमखास येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी सपर्क करून रुग्णवाहिका बोलाविली. त्या रुग्णवाहिकेद्वारे भाजलेल्या दोघांनाही तासभरानंतर धारणी येथीत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी रुग्णांना न पाहताच तत्काळ १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून दोन्ही भाजलेल्या रुग्णांना अमरावतीत हलविण्यासाठी सांगितले. त्यामुळे दोघांनाही गंभीर अवस्थेत अमरावतीत आणल्या गेले. मात्र, दोघांचाही वाटेतच मृत्यू झाला. धारणीतील डॉक्टरांनी कागदपत्री घोडे दौडवून व उपचार न करता तसेच रुग्णांना न पाहताच अमरावती हलविण्याचे फर्मान सोडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. दोन्ही रुग्ण गंभीर अवस्थेत असताना डॉक्टरांनी त्यांची तपासणी सुध्दा केली नाही. त्यांच्यावर प्राथमिक उपचार न करताच दोन्ही रुग्णांना रेफर केल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. त्यामुळे उपचारात दिरगांई झाल्याने दोघांचीही वाटेतच मृत्यू झाला. असा आरोप मृताचे नातेवाईक गेंदालाल मंगल धांडे व प्रभु मालु धांडे यांनी केला आहे. त्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली असून तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पावित्रा नातेवाईकांनी मंगळवारी उचलला होता.
आदिवासी दाम्पत्याचा जळाल्याने मृत्यू
By admin | Updated: May 4, 2016 00:21 IST