अमरावती : केबल जोडणी कापल्याने संतप्त झालेल्या ग्राहकाने केबल व्यावसायिकावर प्राणघातक चाकूहल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत वलगाव मार्गावरील एका बिछायत केंद्रात घडली. या घटनेमुळे शहरातील केबल व्यावसायिकांत दहशत निर्माण झाली आहे. पोलीस सूत्रानुसार, जखमी सचिन खेडेकर हा विद्युत नगरातील रहिवासी असून तो केबल व्यवसाय करीत आहे. सचिन याने परिसरातील राजेश वानखडे याला केबल जोडणी दिली आहे. राजेश हा गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे तो महिन्यावारीचे केबल जोडणीचे पैसे देत नव्हता. त्यामुळे सचिन खेडेकर याने राजेशची केबल जोडणी बंद केली होती. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सचिन वलगाव मार्गावरील वीरेंद्र अर्डक यांच्या बिछायत केंद्रात बसले होते. दरम्यान तेथे राजेश वानखडे याने केबल जोडणी बंद केल्यावरून वाद करुन सचिनवर चाकुने हल्ला चढविला. हल्ला केल्यानंतर राजेश तेथून पसार झाला. जखमी सचिनला तत्काळ उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आरोपीविरूध्द हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. केबल व्यावसायिक जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेकेबल जोडणी बंद केल्यामुळे सचीनवर हल्ला झाला. त्यामुळे मंगळवारी शहरातील अन्य केबल आॅपरेटर एकत्रित आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. दादागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा व पोलीस सुरक्षा अशी मागणी केबल आॅपरेटरांनी केली होती.
केबल व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: July 1, 2015 00:45 IST