चांदूर रेल्वे : तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनुसार चांदूर रेल्वे शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपली कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन पालिका मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी केले आहे.
स्थानिक पंडित जवाहरलाल नेहरू नगर परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथे सोमवार, ५ एप्रिल रोजी दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांसाठी विशेष चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चांदूर रेल्वे शहरातील कोरोना चाचणी वाढविण्याचे प्रयत्न नगर परिषद प्रशासन करीत आहे. या शिबिरात इतर कुणालाही चाचणी करून घेता येईल. तसेच ग्रामीण रुग्णालयात दररोज सकाळी ९ ते १२ या वेळात चाचणी सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी कोवे यांनी सांगितले. विशेष चाचणी शिबिर संपल्यानंतर सर्व दुकानांना भेटी देऊन चाचणी प्रमाणपत्र तपासण्यात येणार आहे. फेरीवाले, भाजी विक्रेते व इच्छुक सर्वांनी कोविड चाचणी करून घ्यावी, तसेच ४५ वर्षांवरील सर्वांनी कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.