लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सरकीच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी दरवाढ झालेली आहे. त्यामुळे कापसाचेही दर ७२५० ते ७५०० रुपयांवर पोहोचले आहेत. सध्या १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक केलेली आहे.
सीसीआयद्वारा कापसाची खरेदी २४ मार्चपासून बंद करण्यात आली. ग्रेड कमी केल्याने सीसीआयचे दर हमीभावापेक्षा ७४२१ रुपये होते. यामध्ये सरकीचे दर पूर्वी ३३०० रुपये क्विंटल होते ते २६ मार्चला ३७५० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. उन्हाळ्यात सरकीच्या दरात काही प्रमाणात वाढ दरवर्षी होते. सोबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचाही फरक दरावर झाला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात कापसाची काही प्रमाणात दरवाढ झाली असली तरी पुन्हा दरवाढ होईल किंवा हेच दर कायम राहतील, याची शाश्वती नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झाले.
गाठीचा दर ५१५० रुपयांवरसरकीच्या दरात वाढ झालेली असली तरी रुईच्या दरात अद्याप वाढ झालेली नाही. सद्यःस्थितीत रुईचे दर ६५ सेंट पर पाऊंड आहे. तर गठाणचे दर (१७० किलो) ५१७० रुपयांवर आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरची दरवाढ, चीनच्या गारमेंट उत्पादनावर अमेरिकेने वाढविलेला टेरिफ यासह अन्य बाबींमुळे देशांतर्गत कापसाचे दर टिकून असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
"सरकीच्या दरात वाढ झाल्याने कापसाच्या स्थानिक दरात थोडी वाढ झालेली आहे. दरवाढ पुढे कायम राहील, हे निश्चित नाही, यासाठी विविध घटक कारणीभूत असतात."- पवन देशमुख, शेतमालाचे अभ्यासक