अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीकरण आठवड्यातील चार दिवस करण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त आहेत. त्यानुसार दर आठवड्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी मंगळवारी सांगितले.
कोविन ॲपवर ज्यांची नोंदणी होईल त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे आदेश आहेत. या दरम्यान एखाद्याला लस घेतल्यानंतर ताप, स्नायू दुखी यासारखे प्रतिकूल परिणाम जाणवल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि उपचार करून विशेष काळजी घेण्याचेही आदेश आहेत. त्यानुसार आवश्यक यंत्रणा सज्ज असून, मंगळवारपासून लसीकरण सुरू होत असल्याची माहिती डॉ. निकम यांनी दिली.
_लसीकरणामध्ये दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रोग प्रतिकारक क्षमता तयार होते. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधासाठी जे नियम आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे. त्याबाबत सर्वांना सूचना दिल्या जात आहेत. दिवसाला १०० कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सध्या लसीकरणासाठी निश्चित पाच केंद्रांवर लसीकरण होईल. त्यापुढे शासनाच्या निर्देशानुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले. त्यानुसार अमरावतीत जिल्हा रुग्णालय व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या केंद्रांवर लसीकरण आठवड्यात चार दिवस नियमित होईल. पहिल्या टप्प्यात १६ हजार २६२ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे.
बॉक्स
व्हायल उघडल्यानंतर चार तासातच वापर हवा
कोरोना लसीकरणाची व्हायल लाभार्थ्यांना देण्यासाठी एकदा उघडली तर तिचा चार तासाचे आत वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा ती वाया जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यामुळे जर मेसेज दिल्यानंतर काही अनुपस्थित असल्यास उपस्थित असलेल्यांपैकी व ज्यांनी ऑनलाईन नोंदणी आहे. अशा पाच लाभार्थ्यांना एका केंद्रावर लस देण्यात आलेली आहे.
बॉक्स
दोन महिने चालणार पहिला टप्पा
रोज पाच केंद्रावर प्रत्येकी १०० लाभार्थींचे लसीकरण व दर आठवड्यातील दोन दिवस सुट्टीचे गृहीत धरत पहिल्या टप्प्यातील लसीकरण प्रक्रिया किमान दोन महिने चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र वाढविणार केव्हा असा प्रश्न विचारल्या जात आहे. त्यामुळे लसीकरणाचे दिवस वाढवा किंवा केंद्रांची संख्यावाढ करण्यात यावी असा आरोग्य कर्मचाऱ्यांचा सूर आहे.