अमरावती : खुनाच्या गुन्ह्यात अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला उपचाराकरिता सुपरस्पेशालिटी ‘कोविड’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेत असताना आरोपी अचानक पळून गेल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
पोलीस सूत्रानुसार यवतमाळ जिल्ह्यात खून प्रकरणातील आरोपीला या कलम ३०२च्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याने तो येथील अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. सदर २६ वर्षीय आरोपी हा यवतमाळ येथील रहिमनगरात राहतो. त्याला कारागृहातच असताना कोरोनाची बाधा झाल्याने कारागृह प्रशासनाने त्याला उपचाराकरिता कोविड रुग्णालयात दाखल केले होते. येथे उपचार घेत असताना त्याने गुरुवारी रात्री पलायन केले. त्यानंतर मात्र कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना पॉझिटिव्ही रुग्ण पळून गेल्याची तक्रार गाडगेनगर पोलिसांकडे नोंदविली. गाडगेनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर पाठविले आहे. आरोपी पळून गेल्यामुळे भादंविची कलम २२४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.