‘कोरोना’ : माहिती देण्यास ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:52+5:30

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास असणारे सर्व रुग्ण शोधून त्यांच्या तपासणी मोहिमेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. ही मोहीम ६ एप्रिलपर्यंत राबविली जाणार आहे. महापालिका हद्दीतील नागरिकांची तपासणी ही वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे.

'Corona': No information! | ‘कोरोना’ : माहिती देण्यास ना!

‘कोरोना’ : माहिती देण्यास ना!

Next
ठळक मुद्देप्रशासनाला आव्हान : ताजनगर येथे महापालिका पथकाला धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशान्वये ‘अमरावतीकर मात करूया कोरोनावर’ विशेष मोहीम गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आली. ही मोहीम राबविणाऱ्या पथकाला ताजनगर येथे धक्काबुक्की झाली. कुठलीही माहिती देण्यास नकार मिळाला. कोरोना तपासणीच्या नावाखाली ‘सीएए’, ‘एनआरसी’ची नोंदणी सुरू असल्याची अफवा पसरल्याने हा प्रकार येथे घडला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास असणारे सर्व रुग्ण शोधून त्यांच्या तपासणी मोहिमेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. ही मोहीम ६ एप्रिलपर्यंत राबविली जाणार आहे. महापालिका हद्दीतील नागरिकांची तपासणी ही वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे. या चमूसोबत पोलीस पथक देण्यात आले. तथापि, पहिल्याच दिवशी तपासणी चमूला ताजनगर, छायानगर परिसरात नागरिकांचा नकार ऐकावा लागला. ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’चा पगडा कायम असल्याने आरोग्यविषयक माहिती सांगण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. दुसरीकडे झोपडपट्ट्यांमध्ये ‘कोरोना’ हा जीवघेणा असल्याची दहशत पसरल्याने गरीब, सामान्य नागरिक दारावर आलेल्या महापालिका चमूला व्यवस्थित सहकार्य करीत नसल्याचे चित्र गुरुवारी होते. तपासणी चमूसोबत सुरक्षेसाठी पोलीस तैनात होते. नागरिकांना मात्र त्यांच्याकडून बळाचा वापर केला जाण्याची धास्ती होती. यामुळे त्यांची भीती वाढली. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त सुरेश पाटील, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, समाजविकास अधिकारी धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वात ही रुग्ण तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

रुग्ण शोधमोहिमेचा पहिला दिवस होता. काही अडचणी असल्या तरी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून नागरिकांना या तपासणीचे गांभीर्य लक्षात आणून देऊ. ही मोहीम नागरिकांचे आरोग्य जोपासण्याकरिताच सुरू झाली आहे.
- प्रशांत रोडे
आयुक्त, महापालिका.

तपासणीत भावी डॉक्टरांची सेवा
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रुग्ण तपासणी मोहीम युद्धस्तरावर चालविली आहे. गुरुवारी सकाळी ८ पासून शहराच्या विविध भागांत गृहभेटी घेत रुग्ण शोधले जात आहेत. या तपासणी चमूत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळद्वारे संचालित विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. हे भावी डॉक्टर महापालिका चमूसोबत रूग्ण शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत.

चमूकडून प्र-पत्राद्वारे माहिती गोळा
तपासणी चमू ही नागरिकांकडून विविध प्रकारची माहिती भरून घेत आहे. यात घर क्रमांक, कुटुंबातील सदस्यसंख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, संपर्क क्रमांक, वय, पुरुष अथवा महिला, विदेशातील वास्तव्य, देशाचे नाव, कोव्हिड-१९ विषाणूची लागण, कुटुंबात सदस्यांना असलेले विकार अशी विविध १० प्रकारची माहिती प्र-पत्रात भरून घेत आहे.

२२ प्रभागांत वेगवेगळ्या चमू
महापालिका हद्दीत २२ प्रभागांमध्ये वेगवेगळ्या चमू रुग्ण तपासणीसाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत. २ ते ६ एप्रिल दरम्यान प्रभागनिहाय माहिती गोळा करून ती प्रशासनाला सादर करावी लागणार आहे. एका चमूत वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, दोन शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. सोबत एक पोलीस शिपाई देण्यात आला आहे.

Web Title: 'Corona': No information!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.