धारणी : शहरातील कोविड केअर सेंटरवर कंत्राटी नोकरीवर लावण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील गायगोले नामक कर्मचाऱ्याने प्रत्येकी १२ हजार रुपये उकळल्याचा आरोप संबंधितांकडून करण्यात आला. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम सोडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिलेले नियुक्तीचे आदेश संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ते नियुक्तीचे आदेश आहेत की साधे पत्र, ही बाब अनुत्तरित आहे. या प्रकरणात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी होत आहे.
तक्रारीनुसार, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी गायगोले यांनी अजय डहाके, संजू जावरकर, सुधीर सेलेकर, कुणाल गोफणे यांच्याकडून प्रत्येकी १२ हजार रुपये घेतले. कामाचे नियुक्ती आदेश न देता त्यांना कामावर रुजू होण्यास सांगितले. दोन महिने काम केल्यावरही त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाही. त्याबाबत त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, मी आदेश दिले आहेत. तुम्ही गायगोले यांना विचारा, असे उत्तर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळाले. सदर प्रकरण अंगावर शेकण्याचा सुगावा लागताच तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाकडून काहींना कामावरून काढण्याच्या पाच दिवसांपूर्वी नियुक्ती आदेश दिले, तर काहींना नियुक्ती आदेशाविनाच कामावर ठेवले.
नियुक्ती आदेश की साधे पत्र?
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढलेल्या नियुक्ती आदेशात पदाचे नाव सफाई कामगार/ परिचर व दिनांक ११ ऑगस्ट २०२० नमूद आहे. मात्र त्यावर आदेश दिनांक नाही. आवक-जावक कधी झाले, याची माहिती नाही. मानधन किती रुपये देण्यात येणार आहे, याचीही नोंद नाही. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी मात्र आहे. मानधनाचा अनुल्लेख, नसलेल्या तारखेमुळे सारे प्रकरण संशयास्पद झाले आहे.
कोट
आम्हाला कामावर लावल्यानंतर कोणतेही नियुक्ती आदेश दिले नाहीत. तालुका वैदयकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. काम सोडण्याच्या पाच दिवसाआधी आम्हाला आदेश देण्यात आले आणि. लगेचच कामावरून न सांगता कमी केले.
- रीतेश सेलेकर, कंत्राटी कर्मचारी, धारणी