भाजप नगरसेवक तिरमारे व नागलियांची याचिका जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली
फोटो -
जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली अपात्रता याचिका, विरोधकाला मतदान न केल्याचे कारणचांदूर बाजार - स्थानिक नगरपालिकेचे गटनेता मनीष नांगलिया व नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी नगरसेविका लविना सुनील आकोलकर यांचाविरुद्ध दाखल केलेली अपात्रता याचिका जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.
नगरसेविका लविना अकोलकर यांनी २७ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या चांदूर बाजार नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप गटाचे उमेदवार गोपाल तिरमारे याना मतदान न करता प्रहारचे उमेदवार नितीन कोरडे यांना मतदान केले होते. त्यांनी भाजपचा गट सोडून प्रहारच्या गटामध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे सदस्य अपात्रता अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांना अपात्र करण्यात यावे, या मागणीची याचिका गटनेते मनीष नांगलिया व भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याप्रकरणी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. नुकताच दोन्ही पक्षांकडून अंतिम युक्तिवाद करण्यात आला. दुसरीकडे प्रहार व राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते आबिद हुसेन यांनी स्वतः याप्रकरणी लविना अकोलकर यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात वकीलपत्र दाखल करून जोरदार युक्तिवाद केला. अधिनियमातील तरतुदीनुसार भाजपचे गटनेते मनीष नांगलिया यांनी आपली जबाबदारी पार पाडली नसून योग्यरीत्या व्हीप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे लविना अकोलकर या अधिनियमातील तरतुदीनुसार अपात्र ठरत नाही, असा युक्तिवाद आबिद हुसेन यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनी मनीष नागलिया व गोपाल तिरमारे यांची याचिका फेटाळून नगरसेविका लविना अकोलकर यांच्या बाजूने निकाल दिला.