अविरोध निवडणूक : काँग्रेसचे सतीश उईके अध्यक्ष, वऱ्हाड विचार मंचचे सतीश हाडोळे उपाध्यक्ष अमरावती : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सतीश उईके अध्यक्षपदी तर वऱ्हाड विचार मंचचे सतीश हाडोळे उपाध्यक्ष म्हणून अविरोध विजयी झाले. जिल्हा परिषदेच्या २९ व्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी मागील तीन-चार दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार हालचाली सुरू होत्या. रविवारी पार पडलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस अणि वऱ्हाड विचारमंच गटात आघाडी झाली. यात काँग्रेसचे सतीश उईके अध्यक्षपदी तर वऱ्हाड विकास मंचचे सतीश हाडोळे उपाध्यक्षपदी अविरोध निवडून आलेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पाच सदस्यांनी स्वतंत्र वऱ्हाड विचारमंच नावाने गट स्थापन केला. या खेळीने राष्ट्रवादीला जबर हादरा बसला आहे.सत्ता समीकरणासाठी वऱ्हाड विचारमंच, विदर्भ जनसंग्राम, यांच्याशी हातमिळवणी करून काँॅग्रेसने यावेळी जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली. जिल्हा परिषदेत एकूण ५९ सदस्य आहेत. यामध्ये काँग्रेसचे २५, राष्ट्रवादी ७, शिवसेना ७, भाजप ९, प्रहार ५ , जनसंग्राम २, बसप २, रिपाइं १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी रविवारी सकाळी ११ वाजता अर्ज वितरण प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेला वेग आला.
जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता
By admin | Updated: September 21, 2014 23:42 IST