वऱ्हा ग्रामपंचायतीची करामत : सरपंच, सचिवाची चुप्पीतिवसा : तालुक्यामधील वऱ्हा ग्रामपंचायतीच्या आवारात पेव्हींग ब्लॉक बसविण्याची निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच ३ लाख ६४ हजारांचे काम पूर्ण करण्याची अजब किमया सरपंच व सचिवांनी साधली आहे. या नियमबाह्य कामात लाखोंचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार येथील नीलेश श्रीखंडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी यांच्याकडे ८ सप्टेंबर रोजी केली.तिवसा पंचायत समितीअंतर्गत वऱ्हा येथील ग्रामपंचायत आवारात पेव्हींग ब्लॉक बसविण्याकरिता वऱ्हा ग्रामपंचायतीने ई-निविदा प्रसिद्ध केली. निविदा भरण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर आहे व कामाची किंमत ३ लाख ६३ हजार ९७५ रुपये अशी दर्शविण्यात आली. मात्र हे काम वऱ्हा ग्रामपंचायतीने एक महिन्यापूर्वीच पूर्ण केले असल्याने झालेल्या कामाची ई-निविदा प्रसिद्ध करणे ही शासनाची व ईच्छुक कंत्राटदाराची एक प्रकारची फसवणूक आहे. या सर्व प्रकारामध्ये वऱ्हा ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी शासन प्रक्रियेला फाटा देऊन संपूर्ण कामावर किमान ७ लाख ३० हजाराचा खर्च दाखविला आहे. यामध्ये लाखोंचा गैरव्यवहार व शासकीय रकमेची अफरातफर झाल्याचा आरोप श्रीखंडे यांनी केला आहे. झालेल्या कामाच्या पुराव्यादाखल श्रीखंडे यांनी ई-निविदेची प्रत व झालेल्या कामाचे छायाचित्र सीईओंच्या सुपूर्द केला असल्याने या प्रकरणाच्या चौकशीत संबधितांवर कारवाई व गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात वऱ्हा ग्रामपंचायतीचे सचिव बडासे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
निविदा प्रक्रियेपूर्वीच लाखोंची कामे पूर्ण
By admin | Updated: September 11, 2016 00:19 IST