अटक नाही : गुन्ह्यात अडकविण्याची धमकीअचलपूर : परवानाधारक मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक यांच्याविरुद्ध तहसील कार्यालयात शेजारील व्यावसायिकांनी तहसीलदारांकडे दिलेल्या तक्रारीला वेगळेच वळण लागले आहे. यासंदर्भात सहदुय्यम निबंधकाची प्रतिक्रिया घ्यायला गेलेल्या पत्रकारांना त्यांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी परतवाडा मार्गावर भाड्याच्या इमारतीत असलेले दुय्यम निबंधक कार्यालय लोकाग्रहास्तव अचलपूर येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या वार्इंडर रुममध्ये आणण्यात आले. परवानाधारक मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांना त्यामागील जागा बैठकीसाठी देण्यात आली. तेथे चार भिंती उभारून शेड टाकण्यात आले. गेल्या १ मार्च रोजी तेथे संगणक आणून लोकांचे कामकाज करायला सुरुवात झाली. त्यामुळे तहसील कार्यालया शेजारी असलेल्या झेरॉक्स व संगणक व्यावसायिकांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्याची एक प्रत वेगवेगळ्या वृत्तपत्राचे बातमीदारद्वय राज इंगळे व आशिष गवई यांना दिली. यासंदर्भात सहदुय्यम निबंधक अर्जुन बडधे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता बडधेचे माथे ठणकले ते म्हणाले की, तुम्ही पत्रकार शेण खाता, माझ्याविरुद्ध उलटसुलट बातम्या टाकता. माझे काय वाकडे झाले आणि होऊ शकत नाही तुम्ही येथूून चालते व्हा नाही तर तुम्हाला सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार देऊन फसवून टाकील, असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद राज इंगळे व आशिष गवई यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात दिली असून बडधे यांच्याविरुद्ध भादंवि २९४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (शहर प्रतिनिधी)
अचलपूरच्या सहदुय्यम निबंधकांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: March 13, 2016 00:15 IST