लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रियंका दिवाण हिचा खून अतिशय थंड डोक्याने करण्यात आला. खुनानंतर आत्महत्येचा बनाव रचण्यात आला. तो खून तिच्या पतीसह सासू व नणंदेने केला, अशा तक्रारीवरून पोलिसांनी त्या खुनाची संभावना ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ अशी केली. मात्र, तो खून नेमका कसा करण्यात आला, त्याचा उलगडा १५ दिवसानंतरही झालेला नाही. पती डॉ. पंकज दिवाण याने नकारघंटा कायम ठेवल्याने तो ‘हार्डकोअर मर्डरर’ असल्याचे निरीक्षण गाडगेनगर पोलिसांनी नोंदविले आहे. दिवाण मायलेक ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. पंकज दिवाणला २९ एप्रिल रोजी आईसह ताब्यात घेण्यात आले. मात्र, दोघांनीही ‘आजार’ काढल्याने ते इर्विनमध्ये दाखल झाले. दिवाण हे डॉक्टर असल्याने व ते इर्विनमध्येच कार्यरत असल्याने की काय, त्या माय-लेकाची व्यवस्था तेथील पेईंग वाॅर्डमध्ये करण्यात आली होती. तब्बल सहा दिवस इर्विनमध्ये काढल्यानंतर ४ मे रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली. लागलीच न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले.
कबुली नाहीचपत्नीच्या खुनाच्या आरोपात पोलीस कोठडीत असलेल्या डॉ. पंकज दिवाणने मी खून केलेला नाही, असा हेका धरला आहे. घटनेवेळी आपण घरी नव्हतो, सीसीटीव्ही फुटेजमधून त्याचा उलगडा होईल, असा पवित्रा त्याने घेतला आहे. त्याची आईदेखील चकार शब्द बोलायला तयार नाही. पीसीआरच्या उर्वरित दोन दिवसात प्रकरणाचे वास्तव उलगडण्याची शक्यता आहे.