पोलीस आयुक्तांचा निर्णय : रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत प्रवेशअमरावती : शहरात खासगी ट्रॅव्हल्सवरील प्रवेशबंदी शिथिल करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी घेतला. यामुळे खासगी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि मुलींसह सर्वच प्रवाशांची सोय झाली आहे. आता या खासगी बसेस बायपास ‘वेलकम पॉइंट’वर थांबण्याऐवजी रात्री १२ ते सकाळी ६ वाजताच्या दरम्यान शहरातील निर्धारित थांब्यांवर थांबू शकतील. आ. सुनील देशमुख यांनी यासाठी प्रयत्न केले हे विशेष. विस्तृत माहितीनुसार, शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि वाढते अपघात लक्षात घेता जड वाहनांना शहरात प्रवेशासाठी वेळ ठरवून दिलेलाआहे. याच अनुषंगाने माजी पोलीस आयुक्तांनी शहरात येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बायपासवर थांबविण्यात याव्यात, असे आदेश जारी केले होते. या निर्णयामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांमध्ये तर नाराजी होतीच परंतु रात्री बेरात्री ‘वेलकम पॉइंट’वर उतरणाऱ्या प्रवाशांकडून येथील आॅटोरिक्षाधारक मनमानी पध्दतीने भाडे वसूल करीत होते. रात्री-बेरात्री एकटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि मुलींना या ठिकाणी उतरून शहरात निर्धारित स्थळी जाणे प्रचंड असुरक्षित झाले होते. वेलकम पॉइंट हा अमरावती शहरापासून बराच लांब असल्याने येथे उतरणाऱ्या प्रवाशांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. आ. सुनील देशमुख यांनी या मुद्यांबाबत पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना माहिती दिली. हा मुद्दा पोलीस आयुक्तांना पटल्याने त्यांनी रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत खासगी ट्रॅव्हल्सना शहरात प्रवेश दिला आहे. आता पुन्हा खासगी बसेस आता शहरातून धावणार आहे. (प्रतिनिधी) बैठकीत महापालिका आयुक्तांचाही सहभागमहापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त व्हटकर यांच्या समवेत शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. शेवटी पोलीस आयुक्तांनी खासगी ट्रॅव्हल्सना शहरात रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत प्रवेशास अनुमती दिली आहे. आता खासगी ट्रॅव्हल्स शहरातील बडनेरा जुनी वस्ती, एमआयडीसी, दस्तुरनगर, चपराशीपुरा येथे थांबू शकतील.
खासगी ट्रॅव्हल्सवरील शहर प्रवेशबंदी शिथिल
By admin | Updated: July 9, 2015 00:19 IST