सुमारे दोन महिन्याचा कालावधी जवळ आला तरी ग्रामीण रुग्णालयातील केंद्रावर नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध झाला नसल्याची तक्रार आहे. तालुक्यात उपलब्ध असलेल्या इतर लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी पायपीटही केली. पण, तेथूनही त्यांना परत यावे लागले. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन ४७ दिवस लोटले, पण दुसरा डोस मिळाला नाही, अशी खंत अविनाश शिरभाते यांनी व्यक्त केली. श्रीकृष्ण मारबदे यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन ५५ दिवस लोटले तरी दुसरा डोस मिळाला नाही. यामुळे पायपीट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदगाव शहर वगळून इतर ग्रामीण भागातील ७ हजार ८९६ नागरिकांचे लसीकरण झाले. यात पापळ, लोणी, मंगरूळ चव्हाळा, सातरगाव, धामक लसीकरण केंद्राचा समावेश आहे. धामक व सातरगाव लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात आला असून, उर्वरित केंद्रांवर कोविशिल्डचे डोस देण्यात आले आहेत. नांदगावातील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिन लस त्वरित उपलब्ध करावी, अशी मागणी आहे.