वैभव बाबरेकर
अमरावती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय बोर्डाच्यावतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची तहान भागविण्याचे काम बालकामगार करीत आहेत. जिल्ह्यातील १२२ केंद्रांपैकी बहुतांश केंद्रांवर बालकामगारांनाच पाणी वाटपाचे काम करावे लागते. त्यामुळे बालकांना शिक्षणप्रवाहात आणणारे शिक्षण मंडळ व संस्थाच बालकामगारांना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे.बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली असून जिल्ह्यातील १२२ केंद्रांवर ३५ हजार ६२८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यामध्ये २०,७६७ नियमित तर १८८८ बहि:शाल विद्यार्थी आहेत. परीक्षेकरिता जिल्ह्यात सहा दक्षता पथक तयार आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पथक असून त्यामध्ये ३ पुरुष व १ महिला सदस्य आहे. परीक्षेच्या प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त व शिस्तप्रिय वातावरण दिसून येत आहे. त्यातच प्रत्येक परीक्षा केंद्रांवर एक पर्यवेक्षक व सहायक पर्यवेक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सुविधा पुरविण्याचे कार्य करीत आहेत. मात्र, परीक्षा केंद्रांवर बालकामगारांकडून पाणीवाटपाचे काम करुन घेतले जात आहे. बालश्रमिकांचे शोषण रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. मात्र ज्ञानाचा प्रसार करणाऱ्या शिक्षण मंडळाशी संलग्न संस्थाच बालकामगारांचा वापर करीत असल्याचे दुर्देवी चित्र 'लोकमत'च्या सर्व्हेदरम्यान निदर्शनास आले आहे. शनिवारी बारावीचा मराठी विषयाचा पेपर घेण्यात आला. रविवारी सुटी व सोमवारी इंग्रजीचा पेपर होता. पर्यवेक्षकांची जबाबदारी४बारावी व दहावीच्या परीक्षेपूर्वी शालेय संर्स्थंनी नेमलेल्या पर्यवेक्षकांना सूचना पुस्तक देण्यात येते. त्यामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे संस्थांना आवश्यक असते. नव्हे ती त्यांची जबाबदारीच असते, असे विभागीय सचिव प्रदीपकुमार अभ्यंकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. शिक्षण मंडळाचे सूचना पुस्तक संस्थेने नेमलेल्या पर्यवेक्षकांना दिले जाते. त्या सूचनेची अमलंबजावणी करणे सक्तीचे आहे. मात्र, सूचनेचे पालन होत नसेल तर संबंधिताना पत्राद्वारे सूचना देऊ. - प्रदीपकुमार अभ्यंकर,विभागीय सचिव,अमरावती विभाग मंडळ.शालेय संस्थांनी बालकामगार ठेवू नये, असे आढळल्यास पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येईल. असे आढळल्यास कारवाई करु.- डी.बी. जाधव,सहाय्यक कामगार आयुक्त.पाणीवाटप करताना बालकामगार आढळल्यास समितीमार्फत संस्थाच्या प्राचार्यांना पत्र देण्यात येईल. सूचनाचे पालन होणे अनिवार्य आहे. - अजय देशमुख,सदस्य, चाईल्ड लाईन, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. बालकामगार आढळल्यास संपर्क करा४शासन बालकामगार रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शहरात कुठेही बालकामगार आढळल्यास टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन चाईल्ड लाईनचे सदस्य अजय देशमुख यांनी केले.