अमरावती - कोरोनाच्या वाढता प्रकोप थांबविण्याकरिता शहरात सोमवारी सायंकाळपासून सात दिवसांकरिता कडक लॉकडाऊनची घोषणा रविवारी पालकमंत्र्यांनी केली. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच आठवडाभर पुरेल अशा बेताने खरेदीसाठी बहुतांश नागरिक बाहेर पडले नि शहरातील प्रत्येक प्रतिष्ठानांत नागरिकांची एकच गर्दी दिसून आली. यात मास्कचा वापर झाला असला तरी आपली मागणी दुकानदारांपर्यंत पोहचविण्याच्या प्रयत्ना अनेक जण एकमेकांना लोटालाटी करताना दिसून आले. जणू दिवाळीचा हा शेवटचा बाजाराचाच दिवस भासला.
शहरातील विविध रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने रस्तेदेखील जाम झाल्याचा प्रकार घडला. एखादे वाहन विरुद्ध दिशेने निघाले की त्यामागे अन्य वाहनधारकांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या चौकाचौकांत ट्रॅफिक जाम झाल्याच्या घटनांनी दुचाकीस्वारांना उन्हाचे चटके सहन करावे लागले. तसेच वाढत्या पेट्रोलच्या किमतीने नाकीनऊ आलेल्या नागरिकांना गर्दी वाहन सतत सुरू ठेवणे जिव्हारी आल्याचा प्रसंग अनेकांनी बोलून दाखविला.
बॉक्स
दुकानांत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
दुकानांत विविध वस्तू खरेदीकरिता एकत्र गोळा झालेल्या नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क तर लावला, मात्र सोशल डिस्टंसिंग पाळला नाही. एकमेकांच्या तोंडाजवळ जोराने ओरडून दुकानदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे कोण बाधित अन् कोण कसे, याचा अंदाज न लागल्याने आजच्या संपर्काने सात दिवसांचे लॉकडाऊन फत्ते होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.