अमरावती : स्फोटक पदार्थात मोडणाऱ्या जिलेटिन कांड्याची कारमधून अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना दहशतवादी विरोधी कक्षाच्या(एटीसी)च्या अधिकाऱ्यांनी ५ एप्रिल रोजी वडगाव माहोरे गावाजवळून अटक केली होती.
त्यांना न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपींना जिलेटीन कांड्या देणारा मुख्य सूत्रधार शेख इब्राहीम शेख शमशोद्दीन (३६ रा. सलामपुरा, अकोट फैल अकोला) याला मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले आणखी एक वाहन जप्त करण्यात आले आहे.
दहशतवाद विरोधी कक्षातील अधिकाऱ्यांनी वडगाव माहोरेजवळ एका महागड्या चारचाकी वाहनातून १२०० जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी कानसिंह गणपतसिंह राणावत (रा. संगमनेश्वर, नांदगाव पेठ) आणि सूरज भारतसिंह बैस (३१ रा. गजानननगर, नांदगावपेठ) यांना अटक केली. त्यांच्याकडून जिलेटीनच्या कांड्यासह वाहन असा एकूण १० लाख ५९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. या आरोपींना अकोला येथील शेख इब्राहीमने त्याच्या वाहनाद्वारे जिलेटीनच्या कांड्या वडगाव माहोरेपर्यंत पोहोचवून दिल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी शेख इब्राहीमलाही अटक केली आहे. त्याने हा माल कोठून आणला, याची चौकशी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर व त्यांचे पथक करीत आहेत.