मार्चमध्ये तापमान वाढले, तोकड्या सुविधा, मनुष्यबळाचा अभाव, ‘फायर ॲक्शन प्लॅन’ला निधीचा खोडा
अमरावती : विदर्भात जंगल, नैसर्गिक संपदा आणि वन्यजिवांची समृद्धी आहे. मात्र, जंगलांना दरवर्षी लागणारा वनवणवा रोखणे वनविभागापुढे ‘चॅलेंज’ ठरले आहे. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने वनवणवा कमी प्रमाणात होता. मात्र, यंदा फेब्रुवारीपासून जंगलात आग लागण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अमरावती नजीकच्या पोहरा, भानखेड जंगलात वनवणवा सुरूच आहे.
विदर्भाचे जंगल विस्तीर्ण आहे. या जंगलात विविध प्रकारांचे वन्यजीव, पशू, पक्षी आणि वनसंपदा आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जंगलात वनवणवा नियंत्रण व नियोजनाबाबत कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, राज्य शासनाचे वनविभागाकडे दुर्लक्ष चालविल्याने ‘फायर ॲक्शन प्लॅन’ करूनही प्रस्तावित निधी मिळाला नाही, अशी माहिती आहे. गत आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या भागातील जंगलात वनवणवा लागण्याची घटना घडली होती. टिपेश्वर येथील जंगलात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी उपस्थित राहून वनवणव्यावर नियंत्रण करण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले, हे विशेष.
वनक्षेत्र अथवा जंगलातील वनवणवा नियंत्रणास १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाले आहे. वन बीटनिहाय आग नियंत्रणासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वनक्षेत्रात कृत्रिम आग लागल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित वनकर्मचारी, वनाधिकारी कारवाईचे लक्ष्य असतील. अमरावती विभागस्तरावर वनवणवा संरक्षण चमूचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. गत १० ते १२ वर्षांपासून वनक्षेत्रात लागणाऱ्या आगीच्या घटना लक्षात घेता, ते क्षेत्र लक्ष्य केले आहे.
------------------
वनवणवा रोखण्यासाठी अशा आहेत उपाययाेजना
जंगलात जाळ रेषा तयार करणे. आगीवर नियंत्रणासाठी ब्लोअर मशीन. ग्रास कटर. अग्निरक्षकांची नेमणूक. व्याघ्र प्रकल्पातील राखीव वने. प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातील आगीवर नियंत्रणासाठी वॉच टॉवर. वन राऊंडनिहाय वनकर्मचाऱ्यांकडे जीपीएस. स्वतंत्र वाहनाची सुविधा.
----------------------
मेळघाट, बुलडाणा, अमरावती व अकोला येथील जंगलात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, कृत्रिम आगी लावणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. मार्चपासून वनवणव्यात वाढ झाली आहे. पण, आग नियंत्रणासाठी निधीची कमतरता आहे.
- हरिश्चंद्र वाघमोडे, विभागीय वनाधिकारी, अमरावती.