लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याचे २८ जानेवारी २०२५ रोजी 'मन्नेरवारलू' या जमातीचे जातप्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात आले आहे. अश्विनी अर्जुनराव पोतलवाड, असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागातून २८ नोव्हेंबर २०२४ रोजी बदली होऊन सध्या त्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात कार्यरत आहेत.
पोतलवाड यांनी 'मन्नेरवारलू' या अनुसूचित जमातीचा दावा पडताळणीसाठी कक्ष अधिकारी उद्योग, ऊर्जा व कामगार विमागामार्फत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट, मुख्यालय छत्रपती संभाजी नगर समिती कार्यालयास २३ डिसेंबर २०१८ रोजी प्रस्ताव सादर केला होता.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून ५५१ क्रमांकाचे 'मन्नेरवारलू' या अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र १९ डिसेंबर २०१८ रोजी निर्गमित करण्यात आले होते. उपविभागीय अधिकाऱ्याने दिलेले जमाती प्रमाणपत्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट यांनी रद्द आणि जप्त केले आहे.
मूळ जाती विषयी वस्तुस्थिती लपवून खोट्या माहिती आधारे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या सेवा सुविधांचा लाभमिळविलेला असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम) अधिनियम २००० च्या कलम १० ते १२ मधील विहित तरतुदी अन्वये कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. आता कारवाई करण्यासाठी कक्ष अधिकारी उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
कारवाईचे आदेश मंत्रालयात दाखलपोतलवाड यांची बदली पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात झाल्यामुळे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या कक्ष अधिकारी यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव (आस्थापना) यांना २१ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्रव्यवहार करून किनवट समितीचा मूळ आदेश कारवाईसाठी पाठवला आहे.
चुलत भाऊ, बहिणींचे जातप्रमाणपत्र ठरले होते अवैध
- रक्त नात्यातील चुलतभाऊ सुरेश माधवराव पोतलवाड यांचे जातप्रमाणपत्र ३० सप्टेंबर २००२ रोजी अवैध ठरले होते.
- या आदेशाला त्यांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्र. २९२८/२००३ नुसार आव्हान केले असता, न्यायालयाने ७जुलै २०१५ रोजीचा समितीचा निर्णय कायम ठेवला आहे.
- तर, चुलत बहीण सीमा माधव पोतलवाड यांचे जातप्रमाणपत्र समितीने १४ ऑक्टोबर २००५ रोजी रद्द करून जप्त केले आहे.
- या आदेशाला त्यांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ, औरंगाबाद येथे रिट याचिका क्र.८३४५/२००९ नुसार आव्हान केले असता, हे प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे. ही वस्तुस्थिती समितीपासून लपवण्यात आली होती.