उगवणशक्ती नसलेले बियाणे : भातकुली, दर्यापूर तालुक्यात प्रक्रिया सुरुअमरावती : खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांना उगवणशक्ती नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. त्यापैकी १३८ तक्रारी एकट्या ‘महाबीज’बाबत होत्या. त्यामुळे या वांझोट्या सोयाबीन बियाण्यांचा रोख परतावा देण्याची प्रक्रिया महाबीजने सुरु केली आहे. पूर्णानगर, मार्कीसह भातकुली व दर्यापूर तालुक्यातील २५ शेतकऱ्यांना रोख परतावा मिळाला आहे. अन्य शेतकऱ्यांना परतावा केव्हा देणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. महाबीजसह ईतर १५ कंपन्यांचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या ४९८ तक्रारीपैकी ७८ प्रकरणात रोख व बियाणे स्वरुपात परतावा देण्यात आला. या कंपन्यांविरोधात २१ तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. २७० नमूने प्रयोगशाळेत नापास झाले. तिवसा मतदार संघाच्या आ. यशोमती ठाकूर यांनी बोगस बियाण्यासंदर्भात शेतकऱ्यांना रोख परतवा मिळावा, अशी मागणी लावून धरली होती. ‘लोकमत’ने वांझोट्या सोयाबीन बियाण्यांसंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून या समस्येला तोंड फोडले होते. परिणामी महाबीजने २५ शेतकऱ्यांना रोख परतावा दिला आहे. अन्य शेतकऱ्यांना परतावा मिळण्याची शक्यता आहे. उगवणशक्ती नसलेल्या बियाण्यांमुळे झालेले नुकसान यामुळे काही अंशी भरून निघणार आहे. (प्रतिनिधी)
महाबीजकडून २५ शेतकऱ्यांना रोख परतावा
By admin | Updated: February 9, 2015 23:04 IST