चांदूररेल्वे : मालवाहू मिनीट्रक व कारच्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास चांदुररेल्वे मार्गावरील चिरोडी ते बासलापूरदरम्यान घडली. या अपघातातील तीन गंभीर रूग्णांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस सूत्रानुसार, ताईबाई बलदेव वानखडे (५०) असे मृत महिलेचे नाव असून शीतल वानरे, आरती संजू वानखडे (१३), प्रकाश वानखडे (३०), बेबी अवधूत घाटोळ (५०), सोनू यशवंत घाटोळ (३०), चिराग अविनाश वानरे (८), मिनीट्रक चालक प्रकाश मनोहर वानखडे (३०, सर्व राहणार चांदूररेल्वे) व कारचालक बबन पुरूणाजी ढोके (३५,यशोदानगर) अशी जखमींची नावे आहेत. चांदूररेल्वे येथील रहिवासी वानखडे व वानरे कुटुंबीय रविवारी सकाळी बडनेरानजीकच्या कोंडेश्वर देवस्थानात आयोजित कार्यक्रमानिमित्त कार एम.एच. २७-एच.-४०१७ ने निघाले होते. चिरोडीजवळ विरुध्द दिशेने येणाऱ्या भाजीपाल्याच्या मालवाहू मिनीट्रक एम.एच. ०२ ए.के.-४०७६ ने त्यांच्या कारला जबर धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील आठही जण व मिनीट्रकचा चालक जखमी झाले. अपघाताची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, ताराबाई वानखडे यांचा मृत्यू झाला. अपघातातील गंभीर जखमी प्रकाश मनोहर वानखडे, चिराग वानरे व आरती घाटोळ यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चांदुररेल्वे पोलीस ठाण्याचे एएसआय शामराव जाधव व मोहन सोळंके यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
मालवाहू ट्रक-कारचा अपघात एक ठार, आठ जखमी
By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST