अमरावती : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीस प्रारंभ झाला असून मंगळवार २४ फेब्रुवारीपर्यंत अशा साधारणत: ७० दिवसांच्या कालावधीत सीसीआय व पणनच्या कापूस केंद्रांवर आतापर्यंत २ लाख ५ हजार ६६७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. खासगी जिनिंगमध्ये १ लाख ७३ हजार ३८५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सीसीआयने चार व पणन महासंघाने सात कापूस खरेदी केंद्र १५ नोव्हेंबरपासून सुरू केले होते. या एकूण अकरा केंद्रांवर २४ फेब्रुवारीपर्यंत २ लाख ५ हजार ६६७ क्विंटल कापूस विक्रीस आला होता. मागील वर्षी पणन महासंघाकडे कापूस उत्पादकांनी पाठ फिरविली होती. यावर्षी मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. मात्र शासनाने कापसाला यंदाच्या हंगामात ४ हजार ५० रूपये हमी भाव जाहीर केला होता. परंतु कापूस खरेदी फार कमी झाली आहे. यंदा जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ३५२ हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड करण्यात आली होती. यावर्षीच्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी सीसीआयने पणन महासंघाला कापूस खरेदीसाठी एजन्ट म्हणून जबाबदारी दिली होती. कापूस खरेदीसाठी जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी, अचलपूर, दर्यापूर, वरूड, तिवसा, चांदूरबाजार, अमरावती येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. या केंद्रावर आतापर्यंत २ लाख ५ हजार ६६७ क्विंटल कापूस शासनाने खरेदी केला तर १ लाख ७३ हजार ३८५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यामध्ये पणन महासंघाचे ३५ हजार ७४४, सीसीआयने १ लाख ६६ हजार ९२३ क्विंटल आतापर्यंत खरेदी केला आहे. (प्रतिनिधी)
२ लाख क्विंटल कापसाची ७० दिवसांत खरेदी
By admin | Updated: March 2, 2015 00:35 IST