लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुका व शहरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, शासकीय कार्यालयातील दुर्लक्ष संतापजनक आहे. सोमवारी येथील भूमिअभिलेख कार्यालयात २०० हून अधिक शेतकऱ्यांनी गर्दी केली अन् फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. याकडे स्थानिक विभागप्रमुखांनी सोईस्कर दुर्लक्ष चालविल्याचा आरोप शेतकरी तसेच राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.कर्जमाफी योजनेकरिता नकाशाची आवश्यकता भासत असल्याने शेतकऱ्यांची भूमिअभिलेख कार्यालयासमोर रांग लागत आहे. मात्र, संबंधित विभागाचा एकही कर्मचारी ती गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र येथे दिसत नाही. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांची अडचण कमी करावी. गर्दी होणार नाही, यासाठी गर्दीवर नियंत्रण राखावे, नकाशा देण्याची पद्धत सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली.
भूमिअभिलेख कार्यालयासमोर होत असलेली गर्दी चिंताजनक आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने पत्रव्यवहार करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, अन्यथा कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.- योगेश देशमुख, तहसीलदार