परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून अद्यापपावेतो मंजुरात दिली गेलेली नाही. २०२१-२२ चा अर्थसंकल्प मंजुरीकरिता बाजार समितीने पणन मंडळाकडे सादर केलेला नाही. ही बाब पणन मंडळाने आपल्या १९ मेच्या पत्रातून उघड केली आहे.
२०२०-२१ चा अर्थसंकल्प जानेवारी २०२० मध्ये, तर २०२१-२२ चा अर्थसंकल्प जानेवारी २०२१ मध्ये मंजुरीकरिता पणन मंडळाकडे बाजार समितीला सादर करणे आवश्यक होते. २०२०-२१ चा मूळ अर्थसंकल्प अचलपूर बाजार समितीने मंजुरीकरिता पणन मंडळाकडे सादर केला. पण, त्यात छाननीदरम्यान पाच त्रुटी आढळून आल्यामुळे या अर्थसंकल्पास मंजुरी दिली नाही.
दरम्यान, पणन मंडळाने २३ जुलै २०२० ला राज्यातील बाजार समित्यांचे अर्थसंकल्प मंजूर केले. त्यात अचलपूर बाजार समितीच्या अर्थसंकल्पाचा उल्लेख केला नाही. अचलपूर बाजार समितीच्या त्या अर्थसंकल्पात आढळून आलेल्या पाच त्रुटींची पूर्तता करण्याबाबत पणन मंडळाने २० ऑगस्ट २०२० च्या पत्राद्वारे बाजार समितीला सूचित केले. पण, १९ मे २०२१ पर्यंत बाजार समितीने या त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे पणन मंडळाकडून त्या अर्थसंकल्पाला मान्यता दिली गेलेली नाही. याच दरम्यान २०२१-२२ च्या अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
अचलपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची एक सभा याच अनुषंगाने पाच दिवसांपूर्वी पार पडली. या सभेत अर्थसंकल्पासह अर्थसंकल्प मंजूर नसतानाही होत असलेल्या खर्चावर चर्चा पार पडली आणि हा विषय परत पुढच्या बैठकीत घेण्याचे निश्चित केले गेले.