गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिनाभरावर आलेल्या खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांसह कृषी विभाग करीत आहे. याच दरम्यान शासनाची मान्यता नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांच्या विक्रीसाठी तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातील दलाल जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सक्रिय झाल्याची माहिती आहे. कृषी विभागाद्वारा बोगस बियाण्यांच्या कारवाईत या राज्याचे कनेक्शन समोर आलेले आहे.
अमरावती जिल्ह्यात धामणगाव, यवतमाळमधील बाभुळगाव व वर्धा जिल्ह्यातील पुलगाव या तीन जिल्हा सीमांच्या ट्रॅगलमध्ये शिवाय मध्य प्रदेश सीमेलगत वरुड तालुक्यात दरवर्षी एचटीबीटी बियाण्यांची विक्री होते. याच भागात सातत्याने कृषी विभागाच्या कारवाया होत आहे. कपाशीसाठी शेतकऱ्यांना केंद्र शासन मान्यताप्राप्त बीजी-१ व बीजी-२ या वाणाची लागवड करता येईल. बीजी-३ म्हणजेच एचटीबीटी या वाणाचा वापर केल्यास पर्यावरण कायद्याने गुन्हा ठरणार आहे. त्यासाठी ५ वर्षे कारावास आणि १ लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
कृषी विभागाद्वारा १५ पथकांचे गठन करण्यात आले असून तपासणीच्या कामी लागला आहे. शेतकऱ्यांनी शासनाची मान्यता नसलेल्या इतर कोणत्याही प्रकारच्या कापूस बियाण्याची खरेदी कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून करू नये. शासनमान्यता नसलेल्या एचटीबीटी किंवा कोणत्याही प्रकारच्या बियाण्यांची खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊन पर्यावरणाचे नुकसान होते. त्यामुळे पर्यावरण कायद्यांतर्गत अशा बियाण्यांचा वापर हा कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली.
पूर्वहंगामी कपाशीची लागवड टाळाबियाणे पाकीट सीलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करूनच खरेदी करावी, बियाणांच्या उगवणीची खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत तपासावी.बीजी-२ तंत्रज्ञान सर्व वाणांमध्ये सारखेच असल्याने एका विशिष्ट वाणाची मागणी टाळावी. १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय करू नये. पूर्वहंगामी कपाशी लागवड पूर्णतः टाळण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बोगस बियाण्यांसाठी प्रचलित नावाचा वापरविक्रेते शेतकऱ्यांना घरपोच आपल्या परिसरात प्रचलित वाणांच्या नावाचा वापर करून तणनाशक (राउंडअप बीटी), चोर बोटी, बीडगार्ड, एचटीबीटी या नावाखाली विनापावती बियाणे विक्री करतात. त्यामुळे बोगस व बेकायदेशीर बियाणे विक्री अथवा लागवड करताना आढळून आल्यास जवळच्या कृषी कार्यालयास कळवावे, असे कृषी विभागाने सांगितले.