पालकमंत्री : विद्यापीठात ‘एक संवाद’ विषयावर कार्यशाळाअमरावती : आपल्या विद्यापीठामधून बाहेर पडणारे विद्यार्थी सुसंस्कृत व पदवीधर होण्याबरोबरच भारतीय प्रशासन सेवेत व भारतीय पोलीस सेवेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्नरत व्हावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केली.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचव्दारा आयोजित उच्च शिक्षण संचालक व उपसचिव यांच्या समवेत 'एक संवाद' या विषयावरुन कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सिपना शिक्षण प्रचारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश गुप्ता तर विशेष निमंत्रित म्हणून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे संघटक प्रभुजी देशपांडे उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण मंचचे महामंत्री दीपक धोटे, उचसचिव सिद्धार्थ खरात, माजी उच्चशिक्षण संचालक के.एम. कुळकर्णी, शिक्षण मंचचे उपाध्यक्ष पी.एन मुलकलवार, उच्च शिक्षण सहसंचालक शैलेंद्र देवळाणकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवीण पोटे म्हणाले, आपण कोणासाठी काम करतो हे महत्त्वाचे आहे. आठवड्यातील शिक्षणाच्या ४८ तासांपैकी प्राध्यापक व प्राचार्य, शिक्षक यांनी ज्ञानदानाचे तास वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. येणाऱ्या काळात सर्वांची ताकद एकत्र लावून राज्य शैक्षणिकदृष्ट्या उच्चशिक्षित करण्यासाठी प्रयत्न करू, असे म्हणाले. यावेळी प्रभूजी देशपांडे, धनराज माने यांनी समयोचित भाषण केले. (प्रतिनिधी)
विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत आणावे
By admin | Updated: July 7, 2015 00:07 IST