तीन दिवसांत काढले ८३९ फलक : आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी अमरावती : अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन महापालिकेने सुरू केले आहे. त्याअंतर्गत शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स व झेंडे जप्त करण्यात आले आहेत. बाजार व परवाना विभागाच्या अधीक्षक निवेदिता घार्गे यांच्या नेतृत्वात फ्लेक्स, बॅॅनर काढण्यासाठी पथक कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहितेमुळे का होईना शहरात अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि फ्लेक्सची स्वच्छता मोहीम सुरु झाली आहे. सोमवारी देखील ही कारवाई सुरूच राहणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे ४ जानेवारीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ५ जानेवारीपासून महापालिकेने राजकीय पक्षांनी शहरात लावलेले होर्डिंग्ज, बॅनर्स व झेंडे काढण्यास सुरुवात केली. ५ जानेवारीला ५२३, ६ जानेवारीला १९३ व ७ जानेवारीला १२३ झेंडे जप्त करण्यात आलेत. पाचही प्रशासकीय झोनमध्ये पथक कार्यान्वित करून ही कारवाई करण्यात आली.त्यात विविध राजकीय पक्षांचे शेकडो होर्डिंग्ज, बॅनर्स व झेंडे जप्त करण्याची कारवाई शनिवारी करण्यात आली. आचारसंहितेच्या निमित्ताने का होईना, शहरातील अनधिकृत बॅनर्स, झेंडे काढण्यात येत असल्याने शहराचे विद्रुपीकरण थांबणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)मध्यवर्ती चौकात राबवावी मोहीम शहरातील राजकमल, जयस्तंभ, चित्रा, शाम, सरोज आणि गांधी चौक, नमुना भागात सार्वजनिक फ्लेक्स बॅनर लावले जातात. अशा अनधिकृत पोस्टर, फ्लेक्ससाठी उड्डाणपूल हे हक्काचे आश्रयस्थान ठरले आहे. महापौरांकडून आमदार-खासदारांचे अनेक अनधिकृत पोस्टसर या भागात लागतात. त्यामुळे बाजार व परवाना विभागाने या भागात मोहीम राबवून हा परिसर फ्लेक्समुक्त करावा, अशी अमरावतीकरांची अपेक्षा आहे. अंतर्गत भागात बॅनर ‘जैसे थे’शहराच्या अंतर्गत भागात अनेक राजकीय पक्षांचे बॅनर ‘जैसे थे’ आहेत. याशिवाय इच्छुकांची शुभेच्छा फलकेही लागली आहेत. रविनगर, अंबागेट, देवरणकरनगर, बियाणी महाविद्यालय परिसरातही शुभेच्छा फ्लेक्स लावली.
शहराच्या विद्रुपीकरणाला ‘ब्रेक’
By admin | Updated: January 9, 2017 00:07 IST