लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात गुलाबी बोंडअळीपेक्षाही सततच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगासह झालेल्या बोंडसडने २.१७ लाख हेक्टरवरील कपाशीचे पीक बाधित झाले आहे. एकूण क्षेत्राच्या ८९ टक्के क्षेत्रात हे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे.जिल्ह्यात सार्वत्रिक बोंडसड अन् बोंडअळीमुळे नुकसान झालेले आहे. यात बोंडसड ही दोन प्रकारची आहे. यामध्ये बोंडाच्या पृष्ठभागावर होणाऱ्या संसर्गाला काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषावर जगणारे सूक्ष्मजीव, तसेच काही प्रमाणात बोंडावरील करपा जिवाणू कारणीभूत ठरतात. बोंडे परिपक्व व उमलण्याच्या अवस्थेत हे प्रकार घडतात. बहुतेक वेळा बोंडावरच बुरशीची वाढ दिसून येते. सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस याला कारणीभूत ठरत आहे. याशिवाय कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे जिवाणू आणि काही प्रमाणात आंतर वनस्पतीय रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे रोग होतो, कपाशीची बोंडे बाहेरून अगदी निरोगी दिसतात. मात्र, फोडली असता, आतील कापूस पिवळसर गुलाबी, लाल रंगाची होऊन सडल्याचे दिसून येते. कपाशीची रुईदेखील सडल्याचे आढळते. जिल्ह्यातील कपाशी क्षेत्राचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केल्यानंतर नुकसानाची तीव्रता स्पष्टपणे जाणवत आहे.
तालुकानिहाय नुकसानजिल्ह्यात कपाशीचे २.४४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात अमरावती तालुक्यात १५,९९९, भातकुली ४,०५०, चांदूर रेल्वे ६,२८०, धामणगाव रेल्वे १६,८१०, नांदगाव खंडेश्वर ६,५००, अचलपूर १४,५००, अंजनगाव सुर्जी १७,५३८, दर्यापूर ३६,७०१, धारणी ९०, चिखलदरा १८,५९, मोर्शी २९,८२६, वरूड २९,८९१, तिवसा १०,००० व चांदूर बाजार तालुक्यात १६,९५७ हेक्टरमध्ये बोंडसड व गुलाबी बोंडअळी यामुळे कपाशीचे नुकसान झाले आहे.