नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटात आजारी रुग्णाला नशिबाने उपचार मिळाला, तरी देव पावला. रेफर झाल्यावर मृत्यू झाला, तर भीक मागितल्याशिवाय पुढील क्रियेसाठी परिवारापुढे पर्याय नाही. एक-दोन नव्हे दशके नव्हे, तर स्वातंत्र्यानंतरही मेळघाटातील आदिवासींच्या नशिबी सुरू असलेला हा खेळ अविरत सुरू आहे. अचलपूर, अमरावती, नागपूर येथून मृतदेह आणण्यासाठी वर्गणीच करावी लागत असल्याचे वास्तव व तेवढेच विदारक चित्र आहे. सरकार मेळघाटसाठी कोट्यवधीचा खर्च करते; परंतु मेल्यावर काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मेळघाटातील आदिवासी रुग्ण अचलपूर, नागपूर, अमरावती येथे रेफर केले जातात. नेताना वाटेत किंवा उपचारासाठी नेलेल्या ठिकाणी मरण पावल्यास मृतदेह चक्क भीक मागून आणावा लागतो. राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांना अनेक फोन नातेवाईक करतात आणि त्यानंतर वर्गणी गोळा केली जाते.
आमदारांची मागणीधारणी व चिखलदरा तालुक्यासाठी दोन शववाहिका आणि दोन रुग्णवाहिका देण्याची मागणी आमदार केवलराम काळे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदनाद्वारे केली. त्यांनी आश्वासन देत मान्यही केले.
रुग्णवाहिकेत मृतदेह ? नको बाबारुग्णवाहिकेत केवळ आजारी रुग्णांनाच नेण्याचा आरोग्य विभागाचा नियम आहे. मृतदेह शववाहिकेने नेला जातो, परंतु आरोग्य विभागाकडे ती नाहीच. अलीकडे मोथा, दाबिदा हतरू, गौरखेडा कुंभी, राणा मालूर अशा विविध गावांत मृतांना पोहोचविण्यासाठी स्वतः व जवळच्या मित्रांकडून आठ ते दहा हजार रुपये वर्गणी केल्याचे खोज संस्थेचे बंड्या साने यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
"आरोग्यमंत्र्यांनी धारणी व चिखलदरा तालुक्यांसाठी दोन शववाहिका व दोन रुग्णवाहिका देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यातून आदिवासींना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही."- केवलराम काळे, आमदार मेळघाट