लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर ब्लेडने जीवघेणे वार करण्यात आले, तर प्रेयसीने प्रियकरावर बलात्काराचा आरोप केला. ११ एप्रिल रोजी सायंकाळी अचलपूर ते रासेगाव मार्गावरील एका नर्सरीजवळ ती प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सरमसपुरा पोलिसांनी १२ एप्रिल रोजी त्या प्रियकर-प्रेयसीविरुद्ध खुनाचा प्रयत्न व बलात्कार, अॅट्रॉसिटी अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. सरमसपुरा पोलिसांत १२ एप्रिल रोजी सकाळी ११:१७ ला नोंद असलेल्या एफआयआरनुसार, २६ वर्षीय महिला व नीलेश (२८, ता. अचलपूर) यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. दरम्यान, यातील प्रेयसीने ११ एप्रिल रोजी सायंकाळी नीलेश याला अचलपूर ते रासेगाव मार्गावरील नर्सरी परिसरातील कॅनॉलनजीक बोलावले. तेथे तुझ्याशी मला आताच लग्न करायचे आहे, असा आग्रह तरुणीने धरला. त्यावरून तिने त्याच्याशी वाद घातला. त्यावर नीलेश याने आपण काही दिवसांनी लग्न करू, आता अचानक ते शक्य नाही, असे नीलेशने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती ऐकायला तयार नव्हती. सायंकाळी ५:३० ते ७:३० अशी दोन तास त्यांच्यात तो वाद सुरू होता. अखेर तिने त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने त्याच्या मानेवर स्वतःकडील ब्लेडने वार केले त्यामुळे नीलेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या बयाणानुसार, त्याची प्रेयसी असलेल्या २६ वर्षीय तरुणीवर १२ एप्रिल रोजी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
दुपारी ४ वाजता बलात्काराचा गुन्हा१२ एप्रिल रोजी दुपारी ३:५७ वाजता नीलेशविरुद्ध सरमसपुरा पोलिसांनी त्या २६ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून बलात्कार व अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंदविला. नीलेशने लग्नाचे आमिष दिले. तथा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे त्या तरुणीने म्हटले आहे. ज्यावेळी आरोपीस लग्न करण्याचा आग्रह केला. त्यावेळी त्याने चक्क नकार दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले.
"दोन्ही घटना आम्ही नोंदवून घेतल्या. परस्परविरोधी तक्रारीवरून तरुणाविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटीचा तर, तरुणीविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे."- नीलेश गोपालचावडीकर, ठाणेदार, सरमसपुरा