अमरावती : अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना चांदूररेल्वे तालुक्यातील मांजरखेड गावात उघड झाली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री आरोपी अभय राजेंद्र काळेविरुद्ध गुन्हा नोंदविला. ग्रामीण भागातील ही मुलगी मांजरखेड येथे मामाकडे राहून शिक्षण घेत आहे. मामाच्या घराशेजारीच राहणारा युवक अभय याने या अल्पवयीन मुलीला 'प्रपोज' केले. मात्र, तिने नकार दिला. अभयने दुसऱ्या दिवशी तिला रस्त्यात अडवून मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी ती अभयच्या घरी गेली असताना अभयने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तिने विरोध केल्यानंतर अभयने तिच्या मांडीवर चाकूने वार केले. त्या अवस्थेत तिचे छायाचित्रिकरण केले व आणखी तीनवेळा बलात्कार केल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७६(२), (एएन), ३२४, ५०६ (ब) सहकलम ३,४, पॉक्सोनुसार गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा तपास चांदूररेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
ब्लॅकमेलिंग करून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग
By admin | Updated: September 11, 2016 00:08 IST