फॉर्म्युला फिक्स : मेळघाटात 'इलेक्टिव्ह मेरीट'चा शोधअमरावती : महायुतीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले. नव्याने झालेल्या जागावाटपाच्या निर्णयानुसार अमरावती जिल्ह्यात भाजप पाच तर शिवसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. मित्रपक्षाला जिल्ह्यात भाजपच्या कोट्यातून रिपाइं (आठवले गट) साठी मोर्शी मतदार संघ सोडण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी अमरावती जिल्ह्यात भाजप-सेना फिफ्टी-फिफ्टी असे जागावाटपाचे सूत्र होते. मात्र यावेळी भाजपने पाच जागा ताब्यात घेऊन शिवसेनेला राजकीय शक्ती वाढल्याचे दाखवून दिले आहे. भाजपाच्या वाट्याला आलेल्या पाच जागांमध्ये अमरावती, अचलपूर, मेळघाट, धामणगाव व मोर्शीचा समावेश आहे. शिवसेनेला बडनेरा, दर्यापूर, तिवसा या तीनच मतदारसंघांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेने बडनेरा, दर्यापूर मतदारसंघांत उमेदवारांची नावे निश्चित केली आहे. तिवसा मतदारसंघात कोणाचे नाव निश्चित करावे, हे सर्वस्वी अधिकार मातोश्रीवर राखून ठेवल्याची माहिती आहे. मातोश्रीहून घोषित होणारी उमेदवारी चांगलीच रंगत वाढविणारी ठरेल, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले.यापूर्वी अचलपूर मतदारसंघ शिवसेनेला सोडला होता. मात्र, गत निवडणुकीत शिवसेनेला कमी मते मिळाली. त्यामुळे भाजपच्या वाट्याचा हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यात संघ परिवार यशस्वी ठरला आहे. मोर्शी मतदारसंघ भाजपच्या कोट्यातून रिपाइंला सोडण्यात आल्याची माहिती आहे. विद्यमान आमदाराला मोर्शी मतदार संघातून महायुतीत रिपाइची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तिवसा मतदारसंघासाठी शिवसेना नेते उद्या २५ सप्टेंबर रोजी उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार अशी माहिती आहे. भाजप धामणगाव रेल्वे मतदारसंघात परंपरागत नावावरच थांबली आहे. अमरावतीत भाजपला उमेदवारी घोषित करताना 'दम' लागत आहे. राज्य व केंद्र स्तरावरील नेत्यांनी अमरावतीत उमेदवारीसाठी 'फिल्डिंग' लावली आहे. मेळघाट मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून 'इलेक्टिव मेरीट' उमेदवाराला भाजपने प्राधान्य दिले आहे.सेनेचा दावा कायम अचलपूर मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यातच राहील. त्यानुसार बुधवारी मातोश्रीवर वेगवान हालचाली झाल्या. उद्धव ठाकरे यांनी सुरेखा ठाकरे यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेताना अचलपुरातून उमेदवारी दिली जाईल, असा शब्द दिल्याची माहिती आहे. तसे झाल्यास युतीच्या जागावाटप फार्म्युल्यात बदल होईल.
भाजप पाच, सेना तीन
By admin | Updated: September 24, 2014 23:22 IST