दोन जखमींना माजी आमदारांनी उपचारार्थ केले दाखल
परतवाडा : परतवाडा-खोंगडा-धारणी मार्गावरील बेलकुंडनजीकच्या २० फूट उंचीच्या पुलावरून ब्रेक फेल झाल्याने दुचाकीसह युवक खाली कोसळून गंभीर जखमी झाला, तर दुसरा रस्त्यावर फेकला गेला. याच मार्गावरून कामानिमित्त धारणीला जात असलेले माजी आमदार केवलराम काळे यांनी स्वतःचे वाहन थांबवून जखमींना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. मंगळवारी दुपारी २ वाजता ही घटना घडली.
बबलू कळीगे व रणजित भुस्कुटे (दोघे रा. टवलार) अशी जखमींची नावे आहेत. काही मित्रांसह दुचाकीने ते तारुबांदानजीकच्या कान्द्रीबाबा येथील हनुमान मंदिरावर दर्शनार्थ जात होते. बेलकुंडनजीक पुलावरून दुचाकीचे ब्रेक फेल झाल्याने ती पुलाखाली कोसळली. त्यात बबलू कळीगे याला गंभीर दुखापत झाली. रस्त्याने धारणी येथे वाहनाने जात असलेले मेळघाटचे आमदार तथा आदिवासी विकास महामंडळाचे संचालक केवलराम काळे यांनी अपघातग्रस्त पाहताच वाहन थांबविले. त्यांनी सहकारी आकाश खैरकर, सुमीत बेलसरे यांच्या मदतीने जखमींमा वाहनात बसवून बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. तेथून धारणी उपजिल्हा रुग्णालयात नेले. बबलू कळीगे हा गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
बॉक्स
निर्जन रस्ता अचानक देवदूत आले
धारणी-बेलकुंड-अकोट हा व्याघ्र प्रकल्पातून जाणारा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर अत्यल्प प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे माजी आमदार या निर्जन रस्त्यावर जखमींसाठी देवदूत ठरले.