भीम आर्मीने जाळला प्रदीप मिश्रा यांचा प्रतीकात्मक पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 07:50 PM2023-12-18T19:50:45+5:302023-12-18T19:51:41+5:30

प्रवचनातून संविधानाचा विरोध केल्याप्रकरणी कारवाईची मागणी.

bhim army burn pradeep mishra symbolic statue | भीम आर्मीने जाळला प्रदीप मिश्रा यांचा प्रतीकात्मक पुतळा

भीम आर्मीने जाळला प्रदीप मिश्रा यांचा प्रतीकात्मक पुतळा

मनीष तसरे, अमरावती : प्रदीप मिश्रा हे आपल्या प्रवचनातून संविधान बदलविण्याचे वारंवार वक्तव्य करतात. तसेच समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवून महिला व आजच्या तरुणांची डोकी खराब करण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे प्रदीप मिश्रा यांच्या संविधान विरोधी भूमिकेविरोधात भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक येथे प्रदीप मिश्रा यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला.

भानखेडा मार्गावरील हनुमान गढी येथे १६ डिसेंबरपासून प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण हा कार्यक्रम सुरू आहे. रोज लाखोंच्या संख्येने याठिकाणी भाविकांची गर्दी देखील होत आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायदा लागू असताना देखील प्रदीप मिश्रा यांच्या वक्तव्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे भीम आर्मी संघटनेचे म्हणणे आहे. तसेच शिवमहापुराण कथेच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या पोस्टर बॅनरवर तथागत गौतम बुद्ध, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे फाेटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुजन समाजामध्ये यासंदर्भात तीव्र संताप आहे. तसेच प्रदीप मिश्रा हे थोर संत महापुरुषांच्या भूमीवर ढोंगीपणा, पाखंडवाद आणि अंध्रश्रद्धा पसरवत असून भारतीय संविधानाला बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे प्रदीप मिश्रा यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भीम आर्मीने मिश्रा यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून आंदोलन केले.

Web Title: bhim army burn pradeep mishra symbolic statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.