खासगीकरणाविरोधात आंदोलन, कोट्यवधीचे व्यवहार रखडले
अमरावती : केंद्र सरकारने चालविलेल्या बँकांच्या खासगीकरणाविरोधात १५ व १६ मार्च रोजी कर्मचाऱ्यांनी युनाटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वात संप पुकारला. यामुळे शहरासह जिल्ह्यातील विविध बँकांना सोमवारी दिवसभर टाळे होते. दोन दिवसांत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार प्रभावित होतील.
संपात जिल्ह्यातील २८ पेक्षा जास्त राष्ट्रीयीकृत बँकांचे पाच हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती यूएफबीयूचे संयोजक सुभाष सामदेकर, अरुणकुमार आठवले, अश्विन जांभूळकर, सुरेंद्र रामटेके आदींनी दिली. यावेळी बँक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्यावतीने खासदार, पालकमंत्री, आमदार आदींना निवेदन देऊन आपल्या मागण्या शासनदरबारी पोहोचविण्याची मागणी केली आहे.
संपकऱ्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये केंद्र सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केल्याने त्याविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. सरकारने बँकांचे खासगीकरण थांबवावे, सार्वजनिक क्षेत्रातील बँका मजबूत कराव्यात, खासगीकरण करू नये, यांसह अन्य मागण्या केंद्र शासनापुढे मांडण्यासाठी दोन दिवस बँक कर्मचारी संप पुकारला. त्यामुळे आता बुधवारीच कामकाज सुरू होईल.
युनाटेड फोरम ऑफ बॅक युनियनसह ऑल इंडिया बँक एम्प्लाॅईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन, नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडेरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स ,नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ऑफिसर्स आणि बँक एम्प्लाॅईज फेडरेशन ऑफ इंडिया आदी बँक संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत.