नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री आणि वाहतुकीवर बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश
By प्रदीप भाकरे | Published: January 6, 2023 06:02 PM2023-01-06T18:02:26+5:302023-01-06T18:03:29+5:30
नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. गळा कापणे, चेहरा विद्रुप होणे, नाक, कान, व गालावर गंभीर जखमा होणे तसेच दुचाकी वाहनचालक नायलॉन मांजास अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमरावती : संक्रांतीचा सण आठवडाभरावर आला असून, पतंगबाजी सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाच्या ऑनलाइन विक्री व वाहतुकीवर बंदी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कालावधीत नायलॉन मांजा ऑनलाइन पद्धतीने किंवा कुरिअरद्वारे खरेदी किंवा विक्री व पुरवठा करताना व जवळ बाळगताना आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी पोलिस आयुक्त डॉ. नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.
नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. गळा कापणे, चेहरा विद्रुप होणे, नाक, कान, व गालावर गंभीर जखमा होणे तसेच दुचाकी वाहनचालक नायलॉन मांजास अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नायलॉन मांजा नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका निर्माण करतो. त्याचप्रकारे नायलॉन मांजा रस्त्यावर, खांबावर तसाच अडकून राहतो. त्यामुळे पर्यावरणास धोका संभवतो. सबब, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरिता पोलिस आयुक्तांनी यंदाच्या मकर संक्रांतीच्या सणाच्या कालावधी दरम्यान शहरातील नागरिक व व्यावसायिकांना नायलॉन मांजा, प्रतिबंधित साहित्य, ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे पुरविण्यास तसेच नायलॉन मांजा कुरिअरद्वारे वाहतूक करण्यास मनाई आदेश जाहीर केले आहेत.
३१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश -
नायलॉन मांजाबाबतचा हा मनाई आदेश ४ ते ३१ जानेवारीपर्यंत लागू राहील. १४ जानेवारी रोजी मकर संकांतीचा सण असून, या काळात शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून सण साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची खरेदी - विक्री केली जाते. नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनविला जातो. त्यामुळे नायलॉन मांजा सहसा तुटत नाही व काही वर्षे तसाच टिकून राहतो.
नायलॉन मांजाने घेतला होता दिव्याचा बळी -
स्थानिक पुंडलिक बाबा नगरात राहणारी दिव्या शंकर गवई ही परिचारिका तरुणी दुचाकीने कामासाठी निघाली असता रस्त्यात आडव्या आलेल्या नायलॉन मांजाने तिचा गळा चिरला होता. वेळीच मदत न मिळाल्यामुळे तरुणीचा तडफडत मृत्यू झाल्याची सुन्न करणारी घटना २१ जून २०२१ रोजी सायंकाळी घडली होती. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी छापे टाकून नायलॉन मांजा जप्त केला होता.
महापालिकेचेही तपासणी पथक -
महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत नायलॉन मांजाचा वापर व विक्री प्रतिबंधित करण्याकरीता जप्ती व दंडात्मक कारवाई करणेकरीता झोननिहाय पथक गठित करण्यात आले आहेत. सोबतच, महानगरपालिका, महसूल विभाग व पोलीस विभागाचे नॉयलॉन मांजा विक्री व वापर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसंदर्भात तपासणी पथक गठीत करण्यात आले आहे.