दाभी प्रकल्प : पर्यायी रस्त्याची शेतकऱ्यांची मागणी
वरुड : तालुक्यातील दाभी आणि केकतवाडा शिवारातील वहिवाटीकरिता असलेला रस्ता दाभी प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे पाण्याखाली आला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना शेतात ये-जा करता येत नाही. यामुळे कायमस्वरूपी पर्यायी रस्ता मिळावा म्हणून जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तथा पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
तालुक्यातील मौजा दाभी आणि केकतवाडा शिवारात ये-जा करण्यासाठी एकच रस्ता आहे. याच रस्त्याने जाऊन शेती कामे पार पडतात. परंतु, दाभी सिंचन प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे हा रस्ता पाण्याखाली आल्याने शेतात ये-जा बंद झाली. शेतीची कामे बंद पडल्याने शेतातील पिकेसुद्धा घरी आणता येत नाहीत. चांदस वाठोडा लघू, मध्यम प्रकल्पाच्या पाण्यामुळे केकतवाडा व दाभी शेतशिवारामधला वहिवाटीचा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला असून, शेतकरी जीव धोक्यात घालून शेतीची कामे करीत आहेत. यावर तातडीने कायमस्वरूपी रस्ता देण्याची मागणी शेतकरी प्रणय शेंडे, प्रदीप गुल्हाने, सुनील बिडकर, जगदीश तरार, सुनील वानखडे, रमेश कपिले, नंदकिशोर वानखडे, अनिल जिरापुरे, मंदा नेटके यांनी केली आहे.