भाजपचे आंदोलन, महाआघाडी शासनाच्या खोट्या आश्वासनांवर हल्लाबोल
बडनेरा : लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अवास्तव वीज बिल देण्यात आले. त्यापूर्वी शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देऊ, अशा खोट्या घोषणा देणाऱ्या आघाडी सरकारविरोधात भाजपने ५ रोजी बडनेऱ्यातील महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकून हल्लाबोल आंदोलन केले. सक्तीने वसुली, वीज कापल्यास आंदोलन तीव्र करू, असा इशारादेखील देण्यात आला.
वीज बिल माफ करणे, १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणे ही माझी जबाबदारी नव्हे, मंत्रिमंडळाची आहे. मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असे काँग्रेसकडे असणाऱ्या ऊर्जा खात्याचे मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. यामुळे विद्युत ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, असा आरोप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी याप्रसंगी केला. आघाडी शासनाच्या विरोधात नारेबाजी व रोष व्यक्त करण्यात आला. आंदोलनात माजी शहराध्यक्ष जयंत डेहनकर, नगरसेविका गंगा अंभोरे, किशोर जाधव, राजेश शर्मा, वीरेंद्र ढोबळे, अमृत यादव, अन्नू शर्मा, तुषार अंभोरे, शैलेंद्र मेघवानी, मनीष कुथे, प्रदीप पवित्रकार, सूरज जोशी, शैलेश शिरभाते, सुरेश मोरे, उमेश निलगिरे आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.