परतवाडा : परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शिवारात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी उघड झाली. सदर अल्पवयीन मुलगी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घरी जात असताना आरोपीने मागून घेऊन तिचा गळा आवळला. डोक्यावर दगडाचा प्रहार करून, तिचे केस पकडून रस्त्यावरून घासत तिला लगतच्या शेतात नेले. तेव्हा ती बेशुद्ध होती. शुद्धीवर येताच शारीरिक संबंधाची मागणी आरोपीने तिच्याकडे केली. यावर तिने नकार देताच जबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केला.
पीडिता भैसदेही (मध्यप्रदेश) तालुक्यातील असून, ती मजुरीकरिता एका शेतात कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होती. परतवाडा पोलीस ठाण्यात ९ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नीलेश वानखडेविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२) (एन), ३२३, सह कलम ६ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अबदागिरे, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर, सहायक पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली. योगिता ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत. घटनेनंतर आरोपी पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी हा मध्यप्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे.