अमरावती : कोरोना महामारीच्या काळात तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या आशा वर्कर्स कर्मचारी जीव धोक्यात घालून हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला मोठे बळ देत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील अशा वर्कर्स घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेत असल्याने आरोग्य विभागाला मदत होत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अनेक अडचणी येत आहेत. अशा कठीण प्रसंगी आशा वर्कर्स प्रशासनाच्या मदतीला धावून आल्या आहेत. त्यांना दिवसाला केवळ ५० ते ६० रुपये मिळतात. अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून त्या आरोग्य सेवेसाठी सज्ज आहेत. शहरापाठाेपाठ आता ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून जिल्हाभरात उपाययोजना राबविली जात आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील विविध ठिकाणच्या संबंधित व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जात आहे. त्या व्यक्तींवर आशा वर्कर्स लक्ष ठेवून आहेत. तसेच बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत २ हजार ८१ आशा सेविका कार्यरत आहेत. त्या कुटुंबाचा सांभाळ करून अहोरात्र आरोग्यसेवेत सहकार्य करीत आहेत.
बॉक्स
दिवसाला तीस रुपये मानधन
गत महिनाभरापासून आशा वर्कर्स गावोगावी काम करीत आहेत. त्यासाठी शासनाकडून त्यांना एक हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. हे मानधन तुटपुंजे असून शेतावर मजुरी केली तरी दिवसाला २०० ते ३०० रुपये मिळतात. त्यातही अन्य बाबींचा विचार न करता आशा वर्कर्स दिवसाला फक्त ३० रुपये मानधनावर जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. याकडे शासन लक्ष वेधतील काय, असा सवाल त्यांचा आहे.