अमरावती : अपघाताच्या कारणावरुन चार ते पाच जणांनी दोन मजुरांना मारहाण करुन त्यांच्यावर सशस्त्र चाकूहल्ला केला. खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत सिताराम बिल्डिंग येथे मंगळवारी रात्री ७ वाजता ही घटना घडली. मो. मोईम मो. मोबीन (२०, रा. अलीलाल कॉलनी) व शेख मोसीन शेख हसन (२०, रा. आसीर कॉलनी) अशाी जखमींची नावे आहेत.मो. मोईन मो.मोबीन, शेख मोसीन शेख हसन व त्यांचा साथीदार अब्दुल नवशाद हे तिघे मजुरीचे काम करतात. मंगळवारी रात्री ७ वाजता बुधवारा येथील काम आटोपून ते दुचाकीने घरी जात होते. बुधवारा येथील सिताराम बिल्डिंगसमोर त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले. धडक मारणाऱ्या दुचाकीस्वाराला मो. मोइनने नुकसान भरपाई मागीतली. त्या दुचाकीस्वाराने नुकसान भरपाई देण्याचे कबुल करुन याची माहिती त्याने भ्रमणध्वनीद्वारे साथीदारांना दिली. चार ते पाच अज्ञात युवक दोन दुचाकीवर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मो. मोईम व शेख मोसीनला मारहाण करुन त्यांच्यावर चाकूहल्ला केला. हा थरार पाहुन त्यांचा साथीदार अब्दुल नवशाद तेथुन पळाला. घटनेची माहीती खोलापुरी गेट पोलिसांना मिळताच त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)
बुधवाऱ्यात दोन मजुरांवर सशस्त्र चाकूहल्ला
By admin | Updated: August 26, 2014 23:02 IST