लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील भाजी बाजार चौकात सोमवारी रात्री ८ च्या सुमारास पवन पंजाबराव वानखडे (४५) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्याप्रकरणी गुन्हे शाखेने चार मारेकऱ्यांना मंगळवारी सकाळी भुसावळहून ताब्यात घेतले. त्यांना खोलापुरी गेट पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, पवन वानखडे यांच्या मुलाशी असलेल्या जुन्या वैमनस्यातून सुपारी देऊन तो मर्डर करण्यात आल्याचा धक्कादायक उलगडा झाला आहे. विशाल ढोले नामक आरोपीने चार जणांना आपल्या वडिलांच्या खुनाची सुपारी दिल्याचा आरोप मृताच्या मुलाने तक्रारीतून केला आहे.
तक्रारीनुसार विनीत पवन वानखडे याचे तीन वर्षापूर्वी सुशील ढोले याच्याशी मुलीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर त्याच्यावर विनीतच्या मित्राने हल्ला केला होता. त्यात विनीतदेखील तीन महिने कारागृहात होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतरदेखील शुभम ढोले व सुशील ढोले हे विनीतला धमक्या देत होते. दरम्यान, १४ डिसेंबर रोजी रात्री २ च्या सुमारास वैभव पत्रे व साहिल हिरपूरकर याने विनीतचे घर गाठून २० हजारांची मागणी केली होती. पुढे १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:२० च्या सुमारास वैभव याने फोन कॉल करीत २० हजार रुपये दे, अन्यथा तुला व तुझ्या बापाला मारून टाकेन, अशी धमकी दिल्याचे विनीतने तक्रारीत म्हटले आहे. १५ रोजी सायंकाळी ७:१५ च्या सुमारास पवन हा अंबागेटमधून घरी जात असताना त्याला वडील पवन वानखडे हे भाजी बाजार चौकात दिसले, तर वैभव, साहिल, शुभम व सुशील हे चौघे वडिलांशी बोलताना दिसले. पवन तेथे न थांबता निघून गेला. रात्री ८:१८ च्या सुमारास त्याला पित्याच्या हत्येची माहिती कळाली. तो तेथे गेला असता, चारही आरोपी त्याला पळताना दिसले.
खुनाचा गुन्हा दाखल
विनीत पवन वानखडे (१९) याच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी १६ डिसेंबर रोजी वैभव पत्रे, साहिल हिरपूरकर, शुभम ढोले, सुशील ढोले, विशाल ढोले (सर्व रा. अमरावती) विरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. आरोपींनी आपल्या वडिलांना भाजी बाजारात बोलावले. तेथे चाकूने भोसकून त्यांचा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गुन्हे शाखेने भुसावळहून आणले चार आरोपी
गुन्हे शाखाप्रमुख संदीप चव्हाण यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी वैभव ऊर्फ समीर ऊर्फ चिकण्या पत्रे (२४, रा. खरकाडीपुरा), साहिल हिरपूरकर (१९), सूरज पिडेकर (२५) व सौरभ विजयकर (२३, तिघेही रा. महाजनपुरा) यांना भुसावळ येथून ताब्यात घेतले.
खुनानंतर भाजीबाजारात टोळक्याकडून तोडफोड
पवन वानखडे यांच्या खुनानंतर एका टोळक्याने भाजीबाजार चौकातील दुकानांसमोरील वाहनांची तोडफोड केली तसेच त्या भागातील दूध डेअरी, हार्डवेअर, किराणा शॉप जबरदस्तीने बंद केले. एका दुकानाबाहेर ठेवलेले नारळ तेथील दुकानमालकास फेकून मारले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. एकीकडे घटनास्थळावर बघ्यांची गर्दी झाली असताना काहींनी तेथील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी भीतीपोटी स्वतःची दुकाने बंद केली. त्यामुळे मोठी अफरातफर उडाली. परिणामी, खोलापुरी गेट पोलिस स्टेशनसह अन्य पोलिस ठाण्यातून कुमक बोलावत तेथे तैनात करण्यात आली. वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा पोलिसांनी पाठलाग केल्याने भाजीबाजार चौकात एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी, खोलापुरी गेट पोलिसांनी तेथील अंमलदार अमोल पोकळे यांच्या तक्रारीवरून सुजल पंत, कुणाल वासनकर, हेमंत पेठकर, रोहित शेरेकर, प्रथमेश देशमुख, साहिल समीर खान, आकाश उगले, संतोष खडेकार या आठ जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव करून तोडफोडीचा गुन्हा नोंदविला.
Web Summary : Amravati man murdered; son alleges contract killing due to old rivalry. Victim's son had a prior dispute with the accused. Following the murder, a mob vandalized shops, leading to further arrests for rioting and property damage in the market area.
Web Summary : अमरावती में व्यक्ति की हत्या; बेटे ने पुरानी दुश्मनी के कारण सुपारी किलिंग का आरोप लगाया। मृतक के बेटे का आरोपियों से पहले विवाद था। हत्या के बाद, एक भीड़ ने दुकानों में तोड़फोड़ की, जिसके कारण बाजार क्षेत्र में दंगा और संपत्ति के नुकसान के लिए आगे गिरफ्तारियां हुईं।