नेरपिंगळाई : येथील मंडळ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शासनाने खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर तत्काळ फेरफार मिळावा, या उद्देशाने ई-फेरफार ही आज्ञावली विकसित केली. याद्वारे गाव पातळीवरील फेरफार प्रक्रियेचे संपूर्णपणे संगणकीकरण करण्यात आले आहे.
यामध्ये तालुका स्तरावरील तहसीलदार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय व नगर भूमापन अधिकारी कार्यालय हे स्टेट डेटा सेंटरबरोबर सुरक्षित संगणकीय कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात आहे. तसेच या प्रकल्पासाठी गाव पातळीवरील तलाठी व मंडळ निरीक्षक कार्यालयेदेखील वरील कार्यालयाशी जोडण्यात आले आहे. संपूर्ण व्यवस्था संगणकीकृत असूनसुद्धा नेरपिंगळाई येथील मंडळ अधिकारी खरेदीच्या व्यवहारानंतर खरेदीदारांना विनाकारण त्रास देऊन फेरफार नामंजूर करीत असल्याची तक्रार खरेदीदारांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना लेखी स्वरुपात केली आहे. शेतीची रीतसर खरेदी झाल्यानंतर मोर्शी येथे रजिस्टर कार्यालयात नोंद केल्यानंतर पुढील कार्यवाहीकरिता तलाठी कार्यालयात सर्व कागदपत्रे सादर केली जातात. परंतु, या भागातील मंडळ अधिकारी योगेश गिरपुंजे या फेरफारवर अयोग्य कारणे देऊन फेरफार रद्द करीत असल्याची व विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार खरेदीदार यांनी केली आहे. याबाबत खरेदीदारांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचेसुद्धा खरेदीदारांचे म्हणणे आहे.
कोट
सदर फेरफार हा दुय्यम निबंधक कार्यालय मोर्शी यांचेकडून आला आहे. ७/१२ वर योग्यरीत्या अंमल झालेला नसल्याने सबब फेरफार नामंजूर करण्यात आला.
- योगेश गिरपुंजे,
मंडळ अधिकारी नेरपिंगळाई भाग १