चाफेकरांना बांधकाम विभागाचे अभय : अपघाताची शक्यता बळावली अमरावती : राजकमल ते बडनेरा या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील राजापेठ 'ओव्हर ब्रिज'ला 'अॅप्रोच' रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. आरओबीच्या कंत्राटदाराला बांधकाम विभागाचे अभय असल्याने या रस्त्याला खड्डायांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रात्रीच्या गुडूप अंधारात कंत्राटदार चाफेकरकडून या अॅप्रोच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याचा दावा महापौर आणि बांधकाम यंत्रणेने केला होता. मात्र, आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात तो तथाकथित डांबरीकरणाचा बोजवारा उडाला आहे. राजापेठ चौकामध्ये ४७ कोटी रुपये खर्चून होणारे उड्डाणपुलाचे काम तूर्तास थंडबस्त्यात आहे. या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी नागपूर स्थित चाफेकर कंस्ट्रक्शन प्रा. लिमिटेडला दिली आहे. पुलाच्या कामासाठी राजापेठ चौकासह श्रीराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर टिनाचे कुंपण आखले आहे. मधोमध हे काम सुरु असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला निमुळत्या रस्त्यांवर वाहतूक सुरू आहे. जड आणि सततच्या वाहतुकीने राजापेठ चौकासह श्रीराम मंदिर व त्यापुढे जाणाऱ्या अॅप्रोच रस्त्याची भयानक दुरवस्था झाली आहे. डांबरीकरणाचा दावा करणाऱ्या चाफेकर कंपनीने या रस्त्यावर केवळ खडीकरणदेखील केलेली नाही. गत आठवड्यात संततधार कोसळलेल्या पावसानंतर या रस्त्यांची लक्तरे वेशीवर टांगली. पावसामुळे कंत्राटदार चाफेकर व त्यांची ही ओढणाऱ्या बांधकाम विभागाचा खरा चेहरा उघड झाला आहे. या रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. कंत्राटदार चाफेकर आणि महापालिकेच्या बांधकाम विभागाबाबत असंतोष उफाळला आहे. विशेष म्हणजे नगरीच्या महापौर चरणजितकौर नंदा या रोज या रस्त्याने ये-जा करतात. तथापि त्यांच्याही सूचनेला पाठ देत कंत्राटदाराने या रस्त्याच्या दुरवस्थेची खबरदारी घेतलेली नाही. श्रीराम मंदिर व श्रीराम संकुलासमोर उड्डाणपुलाचे काम रस्त्याचे मधोमध बंदावस्थेत सुरू असले तरी टिनाच्या कुंपनामुळे हा रस्ता ३ ते ४ फुटाच्या वर नाही. या छोट्याशा रस्त्यावर शेकडो खड्डे पडले असताना चाफेकर कंत्राटदाराला त्या रस्त्याची डागडुजी करण्याचा मुहूर्त मिळालेला नाही. डांबरीकरणाऐवजी खडी टाकल्याने ती पावसात वाहून गेली. परिणामी वर्दळीच्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून प्रवास करणे, अमरावतीकरांच्या नशिबी कोरले गेले आहे, असेच दिसत आहे. (प्रतिनिधी)दोनदा केलेले डांबरीकरण उखडतेच कसे ? महापौरांनी या रस्त्याबाबत प्रशासनाला दोनदा सूचना केली. आरओबीच्या अप्रोच रस्त्याचे रात्रीदरम्यान डांबरीकरण केले जात असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. एक नव्हे, तर दोनदा डांबरीकरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे दोनदा केलेले डांबरीकरण महिनाभरात उखडते कसे, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे थेट आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. कंत्राटदार चाफेकर व बांधकाम विभागाची कानउघाडणी करून या अॅप्रोच रस्त्याच्या सुयोग्य डागडुजीसाठी आता आयुक्तांनीच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे. महापौरांनी केली होती ‘स्पॉट व्हिजीट’ महापौर चरणजितकौर नंदा यांनी शहर अभियंता, कार्यकारी अभियंता व अन्य घटकप्रमुखांनी महिन्याभरापूर्वी या भागाची स्पॉट व्हिजीट केली होती. तथा बांधकाम विभागाची कानउघाडणी करत कंत्राटदार चाफेकरला नोटिस बजावण्याची सूचना केली होती. त्यानंतर या रस्त्याची डागडुजी केल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘आरओबी’च्या अॅप्रोच रस्त्यांची चाळणी
By admin | Updated: August 9, 2016 00:11 IST