धारणी : शहरातील कोविड केअर सेंटरवर कंत्राटी नोकरीवर लावण्याकरिता आरोग्य विभागातील कर्मचारी गायगोले यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १२ हजार रुपये उकळले. त्या तरुणांना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नियुक्ती आदेशही संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे. ते नियुक्ती आदेश ११ ऑगस्ट २०२० चे असून, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांची मस्टरवरील स्वाक्षरी ही १ सप्टेंबर २०२० पासून घेण्यात आल्याची नवीन बाब समोर आली आहे. नियमानुसार त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आठ दिवसांत नियुक्त स्थळी रुजू होणे गरजेचे असते. रुजू झाल्यानंतर तेथील मस्टरवर त्यांची स्वाक्षरी घेऊन त्यांचे पगार देयक अदा करण्यात येते. येथे उलटेच झाले. १ सप्टेंबरपासून ऑक्टोबर महिन्यातील काही दिवस त्यांनी काम केले. तोपर्यंत मस्टरवर स्वाक्षरी घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर न सांगता त्यांना कामावरून कमी करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया संशयास्पद बनली आहे.
नियुक्ती आदेश ११ ऑगस्टचे, मस्टरवर स्वाक्षरी १ सप्टेंबरपासून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST