नरभक्षक वाघाची आणखी एक ‘नरशिकार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:45 PM2018-10-23T23:45:27+5:302018-10-23T23:47:53+5:30

दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्याला ठार केल्यानंतर नरभक्षक वाघाने आणखी एका शेतमजुराची शिकार केली. या घटनेने धामणगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाघाला जेरबंद करण्यात अपयश आलेल्या वनखात्याविरुद्ध मोठा रोष उफाळून आला आहे.

Another 'Narshikar' of cannibal tiger | नरभक्षक वाघाची आणखी एक ‘नरशिकार’

नरभक्षक वाघाची आणखी एक ‘नरशिकार’

Next
ठळक मुद्देतीन दिवसांत दुसरी घटना : वनविभागाविरुद्ध कमालीचा रोष, प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्याला ठार केल्यानंतर नरभक्षक वाघाने आणखी एका शेतमजुराची शिकार केली. या घटनेने धामणगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाघाला जेरबंद करण्यात अपयश आलेल्या वनखात्याविरुद्ध मोठा रोष उफाळून आला आहे.
धामणगाव तालुक्यातील अंजनसिंंगी येथील मोरेश्वर बाबाराव वाळके (४५) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे़ मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर यांचा शुक्रवारी वाघाने बळी घेतल्यानंतर दुसºया दिवशी वनविभागाने बांधलेल्या जिवंत म्हशीला याच वाघाने फस्त केले. त्यानंतर शिदोडी येथील विनोद निस्ताने यांच्या घराबाहेर बांधलेल्या जर्सी कालवडीचे लचके तोडून हा नरभक्षक वाघ सोमवारी पहाटे अंजनसिंंगी किनईच्या जंगलात पसार झाला़ त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तीन पिंजऱ्यांत म्हशी बांधून ठेवल्या होत्या. त्याच जंगलात चारा आणण्यासाठी गेलेल्या मोरेश्वर वाळके यांचे पायच शिल्लक ठेवलेले धड व धडावेगळे शीर मंगळवारी आढळून आले. वनखात्याने जेथे म्हशी बांधून ठेवल्या होत्या, त्याच्या ५० फुटांवर नरभक्षक वाघाने या शेतमजुराची शिकार केली.
९० वेळा नखे, पंजाचा मारा
वाघाने अत्यंत क्रूरतेने शिकार केली आहे. मोरेश्वर यांचे मुंडके धडावेगळे केले. त्यांच्या शरीरावर पंजा व दाताच्या ९० जखमा असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्याने दिला आहे. बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी साडेचार वाजता मोरेश्वर जंगलात गेले होते. ते हमालीचे काम करायचे.
शाळा-महाविद्यालये बंद
वाघाच्या भीतीमुळे धामणगाव व तिवसा तालुक्यांतील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. कुऱ्हा येथील श्रीराम महाविद्यालयात सुरू असलेला विद्यापीठाचा पेपर पुढे ढकलला आहे. अंजनसिंगी येथे तब्बल दीडशे वनकर्मचाऱ्यांचा ताफा असून, विशेष पोलीस पथक, दंगल नियंत्रण पथक कार्यान्वित आहे़
अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
मोरेश्वर वाळके यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने चांदूर रेल्वेच्या महसूल उपविभागीय अधिकारी स्नेहल कनिचे, पोलीस उपविभागीय अधिकारी अविनाश शिंगटे, धामणगाव रेल्वेचे तहसीलदार अभिजित नाईक, नायब तहसीलदार कृष्णा सूर्यवंशी, वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक अशोक कविटकर, वनक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी नातेवाइकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली. दुपारी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला.
काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
नरभक्षक वाघाच्या भीतीपोटी सर्वच कामे ठप्प असून, शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.संबंधित वाघाला ठार मारा किंवा जेरबंद करा, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने ग्रामीण रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी आ. वीरेंद्र जगताप हे मंत्रालयाशी सतत संपर्कात आहेत.
देवगावात बिबट्याचा धुमाकूळ; बकरी फस्त
तालुक्यातील उत्तर व पूर्व दिशेला वाघाची दहशत कायम असताना सोमवारी रात्री दक्षिण दिशेला असलेल्या देवगाव नागापूर भागात बिबट्याने एक बकरी फस्त केल्याची घटना घडली. तालुक्यात नरभक्षक वाघाच्या दहशतीमुळे मनुष्य व प्राणीदेखील सैरावैरा होत आहेत. सोमवारी बिबट्याने नागापूर गावात प्रवेश करीत श्रीधर वरकड यांच्या गोठ्यात बांधलेल्या बकरीवर हल्ला चढविला. धामणगाव रेल्वे तालुक्याचे वनसंरक्षक ए. बी. दातीर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, बिबट्याचे पगमार्क व विष्ठा मिळाली. येथील पंचायत समिती सदस्य रोशन कंगाले, माजी उपसभापती नितीन दगडकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
नागरिक चार दिवसांपासून वाघाच्या दहशतीत जगत आहेत. वनविभागाने कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. मुख्य वनसंरक्षकांनी घटनास्थळी भेटही दिली नाही़ वनविभागाने खबरदारी बाळगली असती, तर दुसरा जीव गेला नसता़ नरभक्षक वाघाला जेरबंद करावे. मृताच्या नातेवाइकाला तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे. दहा लाखांची मदत नगदी स्वरूपात द्यावी, अशा मागण्या मृताच्या कुटुंबीयांनी केल्या. त्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता.

Web Title: Another 'Narshikar' of cannibal tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.