अमरावती : विविध कारणांमुळे जिल्हा परिषदेचे बेनोडा, गायवाडी गट व देवगाव तसेच पंचायत समितीच्या वलगाव व कांडली गणांतील सदस्यपदे रिक्त आहेत. या सर्कलमध्ये पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार अंतिम मतदार यादी ५ मार्चला प्रसिद्ध होऊन पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमाकरिता विधानसभेची १५ जानेवारीची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. यात १८ फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १८ ते २६ फेब्रुवारीपर्यंत मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यात येतील. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी होणार आहे. ५ मार्चला प्रभागनिहाय अधिप्रमाणित मतदार यादी तसेच १० मार्चला मतदार केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले.
जिल्हाधिकाऱ्यांद्वारा प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन करण्यात येईल. यात निर्वाचक गण, गटात समाविष्ट मतदारांची संख्या व तयार केलेल्या प्रारुप मततदार यादीतील मतदारांची संख्या समान असल्याबाबतची खातरजमा केली जाईल. दुबार व मृत उमेदवारांच्या नावासमोर फुली मारली जाईल. याशिवाय नव्याने मतदारांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावात दुरुस्ती, पत्त्यांमध्ये दुरुस्ती आदी आयोगाद्वारा केले जात नाही. त्यामुळे मतदार यादीच्या कार्यक्रमात याविषयीच्या दुरुस्तीसह, लेखनिकाच्या दुरुस्ती तसेच दुसऱ्या प्रभागात चुकून अंतर्भूत झालेले मतदार तसेच संबंधित प्रभागात वगळलेली नावे समाविष्ट करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राबविताना कोरोना प्र्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
बॉक्स
या कारणांमुळे पदे रिक्त
बेनोडा : या जिप गटाचे सदस्य देवेंद्र भुयार विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्याने पद रिक्त
* गायवाडी : या जिप गटाचे सदस्य बळवंत वानखडे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्याने पद रिक्त
* देवगाव : या गटाच्या सदस्य प्रियंका दगडकर यांचे निधन झाल्याने पद रिक्त
* वलगाव : या गणाच्या सदस्य वहिदाबी युसूफ शहा यांचे निधन झाल्याने पद रिक्त
* कांडली : या गणाच्या सदस्य विणा ठाकरे यांना विभागीय आयुक्तांनी अनर्ह घोषित केल्याने पद रिक्त