अमरावती : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे गावाेगावी राजकीय वातावरण तापले आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे उमेदवारीकरिता सातवी, पाचवीची अट घातल्याने अनेक अंगठाबहाद्दर हद्दपार झाले आहेत. या माध्यमातून नवतरुणांना ग्रामपंचायतीच्या राजकारणात येण्याची संधी मिळाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य होण्यासाठी पाचवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याची अट निवडणूक आयोगाने घातली आहे. त्यामुळे अंगठाबहाद्दरांना निवडणुकीत उमेदवार म्हणून लढता येणार नाही. १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांचे शिक्षण सातवीपर्यंत नसेल तर त्यांना निवडणूक लढविता येणार नाही. जिल्ह्यात एकाचवेळी ५५३ पैकी १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता ५४१ ग्रामपंचायतींत निवडणुका होत आहेत. यासाठी नामनिर्देशनपत्रांची प्रक्रिया नामनिर्देशनपत्रे मागे घेणे, उमेदवारी चिन्हांचे वाटप यासारख्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने थेट जनतेच्या माध्यमातून सरपंच निवडीबाबत निर्णय घेतला होता. परंतु सत्तांतर झाल्यावर थेट सरपंच निवडणूक रद्द करण्यात आली. निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गातून सरपंचासाठी निवड होईल, हे निश्चित नाही. उमेदवारांचे पॅनेलप्रमुख अडचणी आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाने १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्यांना सदस्य सरपंचपदासाठी सातवीची अट कायम ठेवली आहे. त्यामुळे आता नव्याने अतित्वात असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अंगठाबहाद्दर हद्दपार होणार आहेत. युवांना अधिक प्रमाणात संधी मिळत असल्याने गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगत वाढली आहे.
बॉक्स
शिक्षणाच्या अटीमुळे ग्रामविकासाला चालना
पूर्वी ग्रामपंचायत प्रशासनात निवडून आलेल्यांमध्ये अशिक्षित महिला-पुरुष सदस्यांचा भरणा असायचा त्यामुळे ग्रामपंचायतीचे एकूणच कामकाज कशा प्रकारे चालते. याविषयी त्यांना ज्ञान नसायचे गावाच्या विकासासाठी पत्रव्यवहार करताना शिक्षित गाव पुढाऱ्याला घेऊन काम करावे लागत असे. सरपंच अधिकारी-कर्मचारी व गाव पुढारी महत्त्वाचे निर्णय घेत होते. परंतु आता शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याने गावाचा विकास होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीला राजकीय दृष्ट्या वेगळे महत्त्व गाव पातळीवर आहे. आपल्याकडे सत्ता असावी या भावनेतून प्रत्येक गट प्रयत्न करून निवडणुकीत मताधिक्य मिळविण्याचा प्रयत्न करतो.