आसेगाव हळहळले : पट्टीच्या पोहणाऱ्याचा पाण्यातच मृत्यू ,गणपती विसर्जनाच्या आनंदावर विरजण श्याम होले आसेगाव पूर्णा२५ वर्षांचा सळसळत्या रक्ताचा तरूण. गावातील गणेशोत्सव मंडळाचा उत्साही कार्यकर्ता. प्रत्येक आयोजनात त्याचा सक्रिय सहभाग. दहा दिवस त्याने उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. रविवारची अनंत चतुर्दशी मात्र, त्याच्यासाठी काळ बनून आली. कुटुंबीयांसह घरगुती गणेश विसर्जनासाठी तो नदीवर गेला आणि पट्टीचा पोहणारा असूनही कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत त्याचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे अख्खे गाव हळहळले. नाना भारत वाटाणे. बालवीर गणेशोत्सव मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो त्याच्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी पूर्णानदीवर गेला. सोबत होते त्याचे वडील भारत वाटाणे आणि मोठे काका रमेशपंत वाटाणे तसेच कुटुंबातील इतरही सदस्य. नदीवर पोहोचताच त्याने प्रथम पूर्णा नदीत आंघोळ केली आणि पलिकडच्य काठावरून पूजेसाठी रेती आणली. गणेशाची पूजा व आरती केली. त्यानंतर तो दरवर्षीप्रमाणे गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन नदीच्या पात्रात उतरला. पण, दुर्देवाने नदीपात्रावरील खडकावरून त्याचा पाय घसरला आणि तो पुलानजीकच्या खोल डोहात ओढला गेला. पाण्यात गटांगळ्या खात असताना अनेक जण त्याला पाहात होते. पण, तो पट्टीचा पोहणारा असल्याने तो बुडेल, असे कोणालाच वाटले नाही. त्यामुळे नाना थट्टा करतोय, असाच प्रत्येकाचा समज झाला. पण, जेव्हा त्याचे डोकेही पाण्याखाली गेले तेव्हा सगळ्यांचे श्वास रोखले गेले. मग, एकच धावाधाव सुरू झाली. यावेळी अन्य कोणीच पट्टीचा पोहणारा उपस्थित नव्हता. काही वेळाने पोहता येणारा युवक अभिषेक मानकर हा तेथे पोहोचला. त्याने पोहत जाऊन नानाला पकडण्याचा प्रयत्न केला.काळाने घातली झडपअमरावती : पाणी अधिकच खोल असल्याने त्याचेही अवसान गळाले आणि नाना त्याच्या हातून निसटला. त्यानंतर १० मिनिटांनी टाकरखेडा आणि आसेगाव येथील सुमारे २० ते २५ तरूणांनी पाण्यात उतरून त्याचा शोध घेतला. पण, त्यांना नानाचा थांगपत्ता लागला नाही. शेवटी कसाबसा तो आढळून आला. नानावर प्रथमोपचार करून त्याला आरोग्य केंद्रात नेण्यात आले त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. परंतु पाण्याखाली तब्बल अर्धा तास राहिल्याने त्याचा नदीमध्येच बुडून मृत्यू झाला होता. नानाच्या आकस्मिक मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनास्थळी नदीपात्रामध्ये मोठमोटे खड्डे असून त्यावरून वेगाने पाणी प्वाहते. त्यामुळे खडकाच्या बाजूला मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. यापूर्वी येथे दोघांचे बळी गेले आहेत. घटनेनंतर आसेगाव पोलिसांनी घटनास्थळा भोवताल पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
आणि तो जन्मदात्याच्या डोळ्यांदेखत बुडाला!
By admin | Updated: September 28, 2015 00:22 IST